पाच नंबर चौकात वाहतुकीची कोंडी
लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौकात सायंकाळच्या वेळी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे दुचाकीचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. बायपास रोड झाल्यामुळे औसा शहराकडे जाणारी वाहतूक याच मार्गाने होत आहे. परिणामी, अवजड वाहनामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच सिग्नल बंद असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे शहर वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शहर वाहतूक शाखेची मोहीम
लातूर : शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर विरोधात शहर वाहतूक शाखेच्या वतीने धडक कारवाई मोहीम राबविली जात आहे. महात्मा गांधी चौक, गंजगोलाई, दयानंद गेट परिसर, राजीव गांधी चौक, रेणापूर नाका आदी भागात शहर वाहतूक शाखेची पथके तैनात करण्यात आली आहेत. सायलेन्सर जप्त केले जात असून, वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
बनिम जळल्याने दीड लाखांचे नुकसान
लातूर : शेतातील चार एकर हरभरा पिकांचे बनिम जाळल्याची घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ परिसरात घडली. याप्रकरणी फिर्यादी अरुण भगवानराव शेटकार यांच्या तक्रारीवरून शिवाजी माणिक उमाटे यांच्याविरोधात शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तपघाले करीत आहे. या घटनेत फिर्यादीचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बसची धडक; एक जण जखमी
लातूर : चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटी येथे बस चालकाने बस न थांबवता फिर्यादीस डावे बाजूने धडक देऊन किरकोळ जखमी केले. याप्रकरणी फिर्यादी केशव सोपान कदम यांच्या तक्रारीवरून बस क्रमांक एमएच २०. बीएल ३०९३ च्या चालकाविरोधात चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मामडगे करीत आहेत.
सोमेश्वर वाघमारे यांचा लातुरात सत्कार
लातूर : एमआयडीसी परिसरातील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयात तपासणीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी सोमेश्वर वाघमारे यांनी भेट दिली. जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सलीमा सय्यद यांच्या हस्ते वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या निकालाबद्दल प्राचार्या सय्यद यांनी माहिती दिली. याप्रसंगी प्रा. सुनील नावाडे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
उदगीर शहरातून मोबाईलची चोरी
लातूर : उदगीर शहरातील एका कार्यालयातील स्वागत कक्षात चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल आणि घड्याळ चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी फिर्यादी प्रहार मारुती सोमवंशी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध उदगीर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मडोळे करीत आहेत. दरम्यान या घटनेत २१ हजार ३०० रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मारहाण करून जीवे मारण्याची धमकी
लातूर : तू माझ्यावर जळकोट पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली केस मागे घेतली नाही म्हणून घरात प्रवेश करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी अंकुश मेघराज राठोड यांच्या तक्रारीवरून पंडित विनायक राठोड यांच्याविरोधात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी कुलकर्णी करीत आहेत.
शहरात नवीन बांधकामांना वेग
लातूर : कोरोनाच्या संकटामुळे काही दिवस शहरातील बांधकामे बंद होती. या कामांना वेग आला असून, लातूर शहरासह हरंगूळ नवीन वसाहत परिसरात बांधकामे प्रगतीपथावर आहेत. यंदा समाधानकारक पाऊस झालेला असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी असल्याने बांधकामे सुरू करण्यात आली असल्याचे हरंगूळ परिसरातील बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
मनपा, पोलीस प्रशासनाची कारवाई मोहीम
लातूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क आणि फिजिकल डिस्टन्स बंधनकारक करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शहर महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध चौकात विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा नियमित वापर करावा, आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत जयंती साजरी
लातूर : जिल्हा परिषदेत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाळासाहेब शेलार, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर मोरे, सहायक प्रशासन अधिकारी व्ही.व्ही. मसलगे, रामकृष्ण फड, मनीषा चामे आदींसह जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी माती परीक्षण करुन घ्यावे
लातूर : माती हे वनस्पतीच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारे सजीव व नैसर्गिक माध्यम आहे. खनिज, सेंद्रीय घटक, पाणी आणि हवा हे जमिनीचे प्रमुख घटक असून पीक वाढीसाठी या घटकांचे प्रमाण एकत्र असते. यासाठी शेतजमिनीची ठराविक कालावधीने मृदा तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई रोड येथे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचे नमुने तपासणीसाठी आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.