लातूर : अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील घटनेप्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात येऊन, त्यासाठी २३ मार्च रोजी अहमदपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कोपरा येथील घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, असे निवेदन मराठा क्रांती मोर्चासह विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी पोलीस प्रशासनास दिले होते. मात्र, अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा व विविध संघटनांची व्यापक बैठक होऊन मंगळवारी सकाळी १०.३० वाजता अहमदपूर तहसील येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा व सजग नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ विशेष पोलीस महानिरीक्षक व पालकमंत्र्यांची भेट घेणार आहे.