अहमदपूर : राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ वरील शिरुर ताजबंद गावाजवळील बाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, सर्वाधिक वाहतूक असलेल्या अहमदपूर वळण रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. त्यामुळे शहरातील वाहनधारकांची कसरत होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ साठी भूसंपादन आणि मार्ग निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे. यात शिरुर ताजबंद गावाजवळून जाणाऱ्या वळण रस्त्याचे मातीकाम सुरु झाले आहे. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष काँक्रिटच्या कामास सुरुवात होणार आहे. तसेच या वळण रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजाही मागील वर्षी वाटप करण्यात आला आहे. परंतु, अहमदपूर शहराबाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम २०१७ पासून अद्यापही रखडले आहे.
अद्यापपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यास मावेजा मिळाला नाही. याबाबत मावेजा अधिक असल्याने हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या लवादाकडे होते. परंतु, यासंबंधीचा निकाल लागून वर्ष उलटले तरी संबंधित भूसंपादनाचे काम रखडले आहे. त्यासाठी २७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली, नागपूर व नांदेड येथे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळताच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या नावे मावेजा जमा होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
१५ दिवसात मावेजा मिळणार...
अहमदपूर शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या मावेजा संबंधीचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या दिल्ली, नागपूर आणि नांदेड येथील कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाली आहे. येत्या १० दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर मावेजा जमा होणार असल्याचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.
मावेजा त्वरित वाटप करावा...
अहमदपूर वळण रस्त्याचे काम २०१७ पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे गेले होते. मार्चमध्ये मोबदल्याची रक्कम राज्य शासनाकडे आली. त्यानंतर काही शेतकऱ्यांना वाटप झाले. परंतु, अनेकांची रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा मावेजा त्वरित देण्यात यावा, अशी मागणी आशिष गुणाले यांनी केली आहे.
मावेजा वाटपात भेदभाव...
मावेजा वाटपात भेदभाव झाल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काहींना नोटीस देऊन त्यांचा मावेजा खात्यावर जमा करण्यात आला आहे. काहींना अद्यापही नोटीस प्राप्त झाली नाही, अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे.