चक्काजाम आंदोलन; वाहनांच्या रांगाच रांगा...
केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी शनिवारी दुपारी १२ ते ३ या कालावधीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मार्ग रोखल्याने दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अंबाजोगाई रोड येथील आंदोलनात काँग्रेस, महाराष्ट्र विकास आघाडी आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये ॲड. व्यंकटराव बेद्रे, मंचकराव डोणे, ॲड. प्रमोद जाधव, बसवंतअप्पा उबाळे, प्रवीण पाटील धनेगावकर, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, प्रा. एकनाथ पाटील, सुरेश चव्हाण, गोविंद पाटील रेणापूरकर, रमेश सूर्यवंशी, ॲड. शेषराव हाके, रणधीर सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैक येथे शनिवारी दुपारी १२ ते २ या कालावधीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा...
लातुरातील आंदोलनात शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. उदय गवारे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विश्वंभर भोसले, अशोक गोविंदपूरकर, काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, दगडू मिटकरी, ॲड. फारूख शेख, आसिफ बागवान, ॲड. देवीदास बोरूळे, सिकंदर पटेल, सचिन गंगावणे, प्रवीण सूर्यवंशी, पंडित कावळे, जगन्नाथ पाटील, ॲड. सुहास बेद्रे, दत्ता सोमवंशी, शरद देशमुख, प्रमोद जोशी, सुंदर पाटील, तबरेज तांबोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकारने पारित केलेले कामगार आणि शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी विविध पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. निलंगा, देवणी आणि रेणापूर येथेही चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
सरकारी बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने केला जात आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
लातुरातील औसा महामार्गावरील वासनगाव पाटी येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास आंदोलन झाले. यावेळी या मार्गावर काही तासांसाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनस्थळी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन झाले.