लातूर : गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाने दरवाढीचा उच्चांक गाठला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागली. अनेकांनी तर तेलाच्या वाढत्या दरामुळे तळलेले पदार्थ खाणे कमी केले होते; मात्र आता खाद्य तेलाची आयात वाढल्याने तेलाचे दर कमी झाले आहेत, त्यामुळे खाद्यतेल स्वस्त झाल्याने पुन्हा एकदा चमचमीत पदार्थ खाण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल आणि खाद्य तेलाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत खाद्य तेलाच्या दरात १० ते २० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. सूर्यफूल तेल पूर्वी १८० रुपये होते. ते आता १६०, सोयाबीन पूर्वी १६० आता १४०, शेंगदाणा तेल पूर्वी ११० आता १०० तर पामतेल पूर्वी १३० तर आता १२४ रुपये लिटरने उपलब्ध होत आहे. दरम्यान, आयात वाढल्याने तेलाचे दर कमी झाले आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष बस्वराज वळसंगे यांनी सांगितले. १० ते २० रुपयांनी दर कमी झाले असले तरी महागाईची झळ कायमच आहे.
गृहिणींचे किचन बजेट सावरले...
वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. त्यात आता तेलाचे दर १० ते २० रुपयांनी कमी झाल्याने किचन बजेट काही प्रमाणात सावरल्याचे चित्र आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलसोबतच खाद्य तेलामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे. सदरील दरवाढ कमी करून दिलासा देण्याची मागणी होत आहे.
आयात वाढल्याने दर कमी
सोयाबीनला या हंगामात उच्चांकी दर मिळाले आहेत. शासनाने ३ हजार ८७० रुपयांचा हमीभाव दिलेला आहे. त्या तुलनेत साडेसात हजारांपर्यंत सोयाबीनचे भाव पोहोचले आहेत. दरम्यान, आयात वाढल्याने दर कमी झाले आहेत. - प्रशांत रेड्डी
आधी शेतीमध्ये तेलपीक घेतले जायचे. नंतर घाण्याचे तेलच घरात वापरले जायचे. आता ही पिके काही प्रमाणात कमी झाली असून, विकतचे तेल घ्यावे लागत आहे. वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असून, आता केवळ १०-२० रुपये कमी केले जात आहेत. - धनंजय जाधव
सूर्यफूल १६०
सोयाबीन १४०
सूर्यफूल १८० - १६०
सोयाबीन १६०-१४०
शेंगदाणे ११० - १००
पामतेल १३० - १२४
करडई २५० - २४०