लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्हा पाेलीस दलातील बहुतांश कर्मचाऱ्यांची लाईफ स्टाईलच बदलली आहे. परिणामी, बंदाेबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेची मर्यादाही राहिली नाही. अनेकांना कुटुंबांना वेळ देणेही शक्य हाेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ना वेळाचा ना वेतनाचा मेळ बसत आहे.
लातूर जिल्हा पाेलीस दलात कार्यरत असलेल्या आणि ५० वर्षे ओलांडलेल्या कमर्चाऱ्यांकडे अद्यापही हक्काचा निवारा नाही. परिणामी २ हजार १११ पैकी तब्ब्ल १ हजार २०० पाेलीस कर्मचारी कुटुंबीयांची निवाऱ्याअभावी परवड सुरूच आहे. याकडे शासनाचेही दुर्लक्ष हाेत आहे.
लातूर जिल्हा पाेलीस दलात एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्के कर्मचाऱ्यांना निवासस्थान उपलब्ध नसल्याने, अनेकांना भाड्याच्या घरात वास्तव्य करावे लागत आहे. तर शासकीय निवासस्थानांची, वसाहतींची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. तर काही ठिकाणी निवासस्थानांच्या भिंतींना तडे गेले आहेत. अशा स्थितीत पाेलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य गत अनेक वर्षांपासून सुरूच आहे. दरवर्षी नव्याने वसाहतींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाताे. मात्र, निर्णय काही हाेत नाही.