प्रा. अक्षता माने यांचा ‘दयानंद’मध्ये सत्कार
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. अक्षता माने यांनी गेट परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा रसायनशास्त्र विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, डॉ. राहुल मोरे, डॉ. अण्णाराव चौगुले, डॉ. युवराज सारणीकर, डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, डॉ. जमन अनगूलवार, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. श्रेयस माहूरकर, डॉ. श्याम इबाते, प्रा. राहुल जाधव, प्रा.बी.डी. कमाले, डॉ. रामशेट्टी शेटकार, प्रा. नवनाथ ढेकणे, प्रा. भाग्यश्री काळे, प्रा. तांबोळी आदींसह विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
सिकंदरपूर येथे वृक्षारोपण अभियान
लातूर : विलासराव देशमुख फाउंडेशन व लातूर वृक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर तालुक्यातील सिकंदरपूर येथे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी ट्वेन्टी-१ शुगरचे विजय देशमुख, माजी व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे, संगीता मोळवणे, लातूर वृक्षचे सुपर्ण जगताप, सुनंदा इंगळे, डॉ. पाटील, शिवाजी देशमुख, प्रशांत ताटे, दत्ता पांचाळ, नागेश चव्हाण, अक्षय देशमुख, गोविंद कांबळे, गजानन बोयणे, नरेश परांडे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती. वृक्ष लागवड आणि संवर्धन हा महत्वाचा उपक्रम असून, यामध्ये इतरांनी सहभाग नोंदवावा, असे यावेळी सांगण्यात आले.
प्रवासी निवारा उभारण्याची मागणी
लातूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ग्रामीण भागात प्रवास करतात. या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. अनेक ठिकाणी प्रवाशांना उभा राहण्यासाठी निवारा नाही. त्यामुळे प्रवासी निवारा उभारण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी प्रवासी निवारे असून, त्यांची काही प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याकडे एसटी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
नांदेड रोडवरील दुभाजकात कचरा
लातूर : राजीव गांधी चौकातून रिंग रोडने नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी तर मोकाट जनावरांचा वावर असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
लातूर शहरातून दुचाकीची चोरी
लातूर : शहरातून दुचाकीची चोरी झाल्याची घटना १८ मार्च रोजी घडली. या प्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा नोंद आहे. फिर्यादी ऋषिकेश विठ्ठल तळेकर यांनी आपली बुलेट क्र. एमएच २४ बीबी ९५९९ घरासमोर रोडवर पार्किंग केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. या प्रकरणी फिर्यादी ऋषिकेश तळेकर (रा. मोतीनगर, लातूर) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गांधी चौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. पवार करीत आहेत.
रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा
लातूर : आपल्या ताब्यातील काळी-पिवळी जीप क्र. एमएच २४ एफ ३७४९ ही रोडवर मध्यभागी उभा करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फिर्यादी तानाजी व्यंकट आरदवाड यांच्या तक्रारीवरून काळी-पिवळी जीप क्र. एमएच २४ एफ ३७४९ च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. स्वामी करीत आहेत.
रस्त्यावर कार पार्किंग; गुन्हा दाखल
लातूर : आपल्या ताब्यातील कार क्र. एमएच २४ व्हीव्ही ८४८० सार्वजनिक रोडवर मध्यभागी उभा करून रहदारीस अडथळा निर्माण करून स्वत:च्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा स्थितीत चारचाकी मिळून आली. या प्रकरणी फिर्यादी सोन्याबापू आप्पाराव देशमुख (एमआयडीसी पोलीस स्टेशन) यांच्या तक्रारीवरून कार क्र. एमएच २४ व्हीव्ही ८४८० च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. जाधव करीत आहेत.
जागतिक चिमणी दिनानिमित्त वृक्षारोपण
लातूर : जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षीमित्र महेबुब चाचा आणि वनअधिकारी एस.जी. तोरकडे यांच्या वतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. तसेच पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी येळण्या बसविण्यात आल्या. यावेळी एस.जी. तोरकडे यांनी जखमी आजारी पशू-पक्ष्यांची सेवा करणाऱ्या महेबुब चाचा यांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी सतीश कांबळे, तानाजी पवार आदींची उपस्थिती होती.
रंगरंगोटीने भिंती वेधताहेत लक्ष
लातूर : महापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर-सुंदर शहर उपक्रमांतर्गत उड्डाण पुलाखालील भुयारी मार्गाच्या भिंतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. आकर्षक चित्र रेखाटण्यात आले असून, पर्यावरणाचा संदेश यामधून देण्यात आला आहे. रंगरंगोटीने तयार केलेल्या भिंती वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या संपूर्ण उड्डाण पुलाच्या भुयारी मार्गात भिंतींची रंगरंगोटी करून आकर्षक चित्रे रेखाटली जात आहेत.