अहमदपूर : ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अहमदपूर पालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह चौक परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने विविध खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना नैसर्गिक विधी करण्यासाठी अडोसा शोधावा लागत आहे. परिणामी, नागरिकांची कुचंबणा होत आहे.
अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहराची लोकसंख्या ८० ते ८० हजारांच्या जवळपास आहे. तालुक्यात एकूण १२४ गावे आहेत. तालुक्याचे ठिकाण असलेल्या विविध खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरात येतात. त्यामुळे बाजारपेठेत सतत गर्दी असते. शहरातील ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, आझाद चौक, सराफा लाइनसह अन्य काही मुख्य चौक आहेत. या ठिकाणी सतत रेलचेल असते, परंतु या भागात सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. परिणामी, लघुशंका आल्यास नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पालिका शहरातील व्यापाऱ्यांकडून कर वसूल करते, परंतु नागरिकांना अपेक्षित मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. शहरात केवळ एकाच ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह आहे, परंतु सध्या तेही कुलूपबंद अवस्थेत पाहावयास मिळत आहे. त्यामुळे नैसर्गिक विधीसाठी नागरिकांना आडोसा शोधावा लागत आहे, याशिवाय महिलांची तर मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. शहर स्वच्छ राहावे, म्हणून पालिकेच्या वतीने दरवर्षी लाखोचा निधी खर्च करण्यात येत आहे, परंतु शहरातील मुख्य चौकातही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.
स्वच्छतागृहाची निविदा प्रक्रिया...
शहरातील एका ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. ते बंद असल्यास तत्काळ सुरू करण्यात येईल, तसेच बस स्थानकासमोरील तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत नगरपालिकेमार्फत सुलभ शौचालय बांधण्याची निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे.
- त्र्यंबक कांबळे, मुख्याधिकारी, पालिका.
काही गल्लीत नाल्याही नाहीत...
शहरातील भाजी मार्केट, थोडगा रोड, फत्तेपूरनगर, साठेनगर, गवळी गल्ली, महादेव गल्ली, लाइन गल्ली, दर्गापूर, पाटील गल्ली, महादेव गल्ली, देशमुख वाडा, फुलेनगर, दस्तगीर गल्ली, मारवाडी गल्ली, बिश्ती गल्ली, ढोर गल्ली, खाटीक गल्ली, भाग्यनगर, इंदिरानगर, श्रीनगर, शंकरनगर, मौलालीनगर, चौंडानगर, भारत कॉलनी, गिरीजा गार्डन, कराड कॉलनी आदी ठिकाणी स्वच्छतागृहांसह रस्ते व नाल्यांची समस्या आहे.