चाकूर : चाकूर ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले असल्याने येथील रुग्णालयातील बाह्यरुग्ण, आंतररुग्णांवर उपचारांसह सर्व कामांचा भार चापोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोपविण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करण्यात आले नाहीत. परिणामी, रुग्णांची हेळसांड होत आहे, तर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
चापोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्ह्यातील सर्वांत मोठे आरोग्य केंद्र आहे. त्याअंतर्गत ४१ गावांचा समावेश आहे. ११ उपकेंद्रे आहेत. सुमारे ७६ हजार नागरिकांना सेवा देण्याचा भार आहे. त्यासाठी तीन वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यातच चापोली, मोहनाळ, टाकळगाव, खुर्दळी ही चार उपकेंद्रे रिक्त आहेत. त्यांचा भार दुसऱ्या उपकेंद्रांवर टाकण्यात आला आहे. शेळगावात वर्षभरापासून आरोग्यसेवक नाही. प्राथमिक केंद्रातील रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी चालक नाही. कंत्राटी चालक घेऊन काम भागविले जाते. पाचपैकी तीन सेवकांची पदे रिक्त आहेत. प्रत्येक उपकेंद्रात एकच आरोग्य परिचारिका आहे. अगोदरच त्यांच्यावर रुग्णसेवेचा ताण असताना आता काेरोनामुळे आणखी ताण वाढला आहे.
चापोली आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र मोठे आहे. त्यातच आता चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयाचा भार आरोग्य केंद्रावर सोपविण्यात आला आहे. चाकुरातील ग्रामीण रुग्णालयात महिनाभरापूर्वी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण सेवा, अंतर रुग्णसेवा, शवविच्छेदन अशी सर्व कामे चापोली प्राथमिक केंद्रावर सोपविण्यात आली आहेत. परिणामी, चाकूर व परिसरातील रुग्णांना आरोग्यसेवेसाठी आता चापोलीला जावे लागत आहे. त्यामुळे रुग्ण नाइलाजास्तव खासगी दवाखाने गाठत आहेत.
चापोली आरोग्य केंद्रावर वाढलेला ताण पाहता तिथे दोन तज्ज्ञ डॉक्टर, ११ परिचारिका तसेच लसीकरणाचे काम ऑनलाईन करण्यासाठी संगणक चालकांची गरज आहे. सध्या कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचाही भार केंद्रावर पडला आहे. सध्या लसींचा तुटवडा असला तरी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर आणखी रुग्णसेवेसाठी व लसीकरणासाठी तज्ज्ञ आरोग्य कर्मचारी कमी पडणार आहेत. त्यामुळे समस्या जाणून घेऊन तिथे अतिरिक्त तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण रुग्णालयात सेवा द्यावी
ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवा चापोली आरोग्य केंद्रावर सोपविण्यात आले आहे. त्यामुळे येथील गरिबांना वैद्यकीय सेवेसाठी चापोलीला जाणे परवडत नाही. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवा लवकर सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी केली.
तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता
चापोली प्राथमिक केंद्रावर अधिक कामाचा भार आहे. त्यात चाकूरचा अतिरिक्त भार पडला आहे. रुग्णसेवा देत आहोत; परंतु चापोली आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिकांची नियुक्ती करणे आवश्यक ठरत आहे, असे चापोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. के. सावंत म्हणाले.
अतिरिक्त भार वाढला
चापोली आरोग्य केंद्रावर अधिक भार पडला आहे. त्यामुळे कोरोना चाचणीचे अहवाल उशिरा येत आहेत. त्यातून रुग्णसंख्या वाढत आहे. कर्मचाऱ्यांवर जास्त ताण झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त करावेत, अशी मागणी चापोलीच्या सरपंच रेखा मद्रेवार यांनी केली.