लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी आणखी १७ रुग्णांची भर पडली. यामुळे बाधितांचा आलेख २४ हजार ३८६वर पोहोचला असून, यातील २३ हजार ४१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत २८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी २६० व्यक्तिंच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर ५३८ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात १५ जण पॉझिटिव्ह आढळले. प्रयोगशाळेतील चाचणीत २ आणि रॅपिड अँटिजेन चाचणीमध्ये १५ असे एकूण १७ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, रविवारी ४४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ३, समाजकल्याण हॉस्टेल, कव्हा रोड येथील ३, गृह अलगीकरणामधील ३५ व खासगी रुग्णालयातील असे मिळून एकूण ४४ जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. श्रीधर पाठक यांनी दिली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१ तर मृत्यूचे प्रमाण २.९
जिल्ह्यात २४ हजार ३८६पैकी २३ हजार ४१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर आतापर्यंत ६९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१ टक्के तर मृत्यूचे प्रमाण २.९ टक्के आहे. रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधीही ४७३ दिवसांवर आहे.