निलंगा शहरात गत दोन-तीन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांची साजरी केली जात आहे. सन २०१९ साली पर्यावरणाचा संदेश देणारी हरित शिवजयंती तर सन २०२० मध्ये विविध संकल्प घेणारी शिवजयंती साजरी करण्यात आली. तिच परंपरा यंदाही कायम राखत आक्का फाउंडेशनच्या वतीने अरविंद पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते अवधूत गुप्ते यांचा 'शिवगर्जना' हा कार्यक्रम तर १९ फेब्रुवारी रोजी मराठी अभिनेते भरत जाधव यांचा प्रसिद्ध ‘पुन्हा सही रे सही’ नाटक सादर होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजीच आरोग्याविषयी जनजागृतीसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. दुपारी व्याख्यान, संध्याकाळी शिवगर्जना कार्यक्रम राहणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, सभापती महादेव फट्टे, नगरसेवक इरफान सय्यद, शंकरापा भुरके, डॉ. किरण बाहेती, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष एम.एम. जाधव, सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. हंसराज भोसले, डॉ. लालासाहेब देशमुख, दत्ता शाहीर, प्रा. दयानंद चोपणे, विलास सूर्यवंशी, रजनीकांत कांबळे, विनोद सोनवणे, रोहित बनसोडे, आरुण साळुंके, महेश ढगे, सुमित इनानी, जाकेर शेख यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
जयंतीवरील निर्बंध उठवावे...
अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आनलाॅक सुरू आहे. अनेक मोठ-मोठे कार्यक्रम घेतले जात आहेत. असे असताना छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. सरकारच्या या निर्णयावर अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, सरकारने जयंतीबाबतचे निर्बंध मागे घ्यावेत, अशी मागणी निलंगेकर यांनी केली आहे.