शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस, महसूल कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील दुर्धर आजार असलेल्यांना मार्चपासून लसीकरण करण्यात येत आहे.
दरम्यान, जनजागृतीसाठी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी तालुक्यात दोन कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. येथील ग्रामीण रुग्णालयात लस सुरक्षित ठेवण्यात आली आहे. तालुक्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच दुर्धर आजार असलेले आणि ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या नियमाप्रमाणे लस देण्यात येत आहे. त्यासाठी आधारकार्ड आधारे ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. लसीकरणास तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही, असे डॉ. जगदीश सूर्यवंशी यांनी सांगितले.
८५६ जणांना दुसरा डोस...
कोविड लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. तालुक्यातील ८५६ जणांना हा डोस देण्यात आला आहे. लसीकरणास वेग वाढला आहे. लसीकरण करुन घेतल्यानंतर कुठलाही त्रास जाणवत नाही. त्यामुळे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, डॉ. ओमप्रकाश कदम, डॉ. रूपाली बलांडे यांनी केले आहे.