गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी
लातूर : शहरातील रेणापूर नाका ते पाच नंबर चौकापर्यंत सिमेंट रोडचे काम करण्यात आले आहे. या मार्गावर अवजड वाहनाची नेहमीच रेलचेल असते. सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. याच मार्गावर शाळा, महाविद्यालय आहे त्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेत संबंधित विभागाने तत्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे.
रिंगरोड परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा
लातूर : शहरातील खाडगाव रिंगरोड परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात नियमित घंटागाडी येत नसल्याने अनेक जण रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकत आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने तत्काळ लक्ष देऊन नियमित घंटागाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.
बांधकाम साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा
लातूर : शहरातील अनेक भागांत बांधकामांना वेग आला आहे. मात्र बांधकामासाठी लागणारे खडी, वाळू, लोखंड आदी साहित्य रस्त्यावर टाकले जात आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. अनेकदा चारचाकी वाहनाला या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन
लातूर : जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुधनाच्या चाऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास ७ लाख ५० हजार पशुधनाची संख्या आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील चारा पशुधनासाठी वापरला जात आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हिरवा चारा बियाणांचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे पशुधनाला हिरवा चारा उपलब्ध होणार असून, चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले.
दहावी उन्हाळी वर्गाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
लातूर : कोरोनाच्या संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे शाळांच्या वतीने नववीच्या विद्यार्थ्यांच्या दहावी उन्हाळी वर्गाला ऑनलाइन पद्धतीने प्रारंभ करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, ऑनलाइन उपस्थितीचे प्रमाणही समाधानकारक आहे. नियमित शाळा सुरू होइपर्यंत ऑनलाइन अभ्यासावर भर दिला जाणार असल्याचे शाळांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ग्रामीण भागातून शहरात भाजीपाल्याची आवक
लातूर : शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत आहे. जिल्ह्यात संचारबंदी असून, अनेक विक्रेत्यांकडून गल्लोगल्ली जाऊन भाजीपाला विक्री केली जात आहे. तसेच नागरिकांनाही घरपोच भाजीपाला मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत भाजीपाला विक्री केली जात आहे.
एसटी प्रवासी सेवेला अल्पप्रतिसाद
लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून, एसटी प्रवासी सेवेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. लातूर विभागात औसा, निलंगा, अहमदपूर, लातूर, उदगीर या पाच आगरांचा समावेश होतो. प्रवासी संख्येच्या दृष्टीने परिवहन महामंडळाच्या वतीने बसेस सोडल्या जात आहे. परिणामी, एसटीच्या उत्पन्नात घट होत असल्याचे चित्र आहे.