खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतीशाळा
लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्या वतीने बियाणे, खतांचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच शेतकरी गटासाठी शेतीशाळा आयोजित केल्या जात आहे. बीबीएफ पेरणी, खते, बियाणे, उगवण क्षमता तपासणी, फवारणी आदींबाबत मार्गदर्शन केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम घेतले जात आहे. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
शहरात टरबूज, आंब्याची आवक वाढली
लातूर : शहरात टरबूज, खरबूज, आंबे आदी रसाळ फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू असल्याने नागरिक फळांच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. शहरातील फळबाजारात सकाळच्या वेळी सौदा होत असून, अनेक व्यापारी तसेच व्यावसायिक गल्लोगली जाऊन फळांची विक्री करीत असल्याचे चित्र आहे.
नेटवर्कचा अडथळा; मोबाइलधारकांची गैरसोय
लातूर : शहरात नेटवर्कचा अडथळा निर्माण होत असल्याने मोबाइलधारकांची गैरसोय होत आहे. अनेकांना इंटरनेट स्पीड कमी मिळत असून, अनेकदा संभाषण चालू असताना फोन कट होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान संबंधित कंपनीकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देऊन संबंधित यंत्रणेने मोबाइलधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.
रोहयोच्या कामांना मागणी वाढली
लातूर : जिल्ह्यात रोजगार हमी योजना विभागाकडे पावणेतीन लाख कुटुंबातील सहा लाख मजुरांची नोंदणी आहे. सध्या उन्हाळा असल्याने रोहयोच्या कामांना मागणी वाढली आहे. तसेच कोरोनामुळे अनेकांचे स्थलांतर झाले आहे. त्यांच्या हाताला रोहयोमुळे काम मिळत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतकडून पंचायत समितीकडे कामाचे प्रस्ताव सादर होताच तत्काळ मंजुरी देण्याच्या सूचना आहेत. घरकूल, शोषखड्डे, वृक्ष लागवड, फळबाग लागवड आदी कामे रोहयोच्या माध्यमातून केली जात आहे. हाताला काम मिळाल्याने अनेक मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे.