सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला म्हटले की, सर्वांनाच धडकी भरत आहे. अशा परिस्थितीत औसा तालुक्यातील बेलकुुंड येथील हरिश्चंद्र कृष्णा साळुंके (९९) यांना अचानक सर्दी, खोकल्याचा त्रास होण्यास २१ एप्रिल रोजी सुरुवात झाली. साळुंके यांना तीन मुले असून, एक मुलगा लातूरला तर दोन मुले गावात राहतात. साळुंके हे आपल्या पत्नीसह गावातच असतात. कुटुंबीय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोविड चाचणी करून घेतली. तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची ऑक्सिजन पातळी तपासली असता ती योग्य असल्याचे दिसून आले.
त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना गृहविलगीकरणात राहण्यास सांगितले. तसेच औषधोपचार सुरू केले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार औषधोपचार घेत असताना आशा स्वयंसेविकांनी समुपदेशन केल्याने मानसिक पाठबळ मिळाले. त्यातून त्यांची प्रकृती सुधारली. साळुंके यांनी औषधांबरोबर वेळेवर सकस जेवण व गरम पाण्याची वाफ घेत असत. सुरुवातीचे दोन दिवस अस्वस्थ वाटत असल्याने जेवणाचीही इच्छा होत नसे. पण, प्रबळ इच्छाशक्तीवर त्यांनी कोरोनावर मात केली आहे. आता ते ठणठणीत झाले आहेत.
आजार अंगावर काढू नका...
कुठलाही त्रास जाणवत असेल तर तत्काळ उपचार घ्या. कुठलाही आजार अंगावर काढू नका. त्यामुळे आजार वाढून त्रास अधिक होतो. वेळीच उपचार घेतल्यास लवकर तंदुरुस्त होता येते, असे हरिश्चंद्र साळुंके यांनी सांगितले.
नागरिकांनी काळजी घ्यावी...
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशा परिस्थितीत कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे. मात्र, मास्कचा नियमित वापर करावा. कुठलीही लक्षणे दिसून येत असल्यास तत्काळ उपचार घ्यावेत. त्यामुळे वेळेवर औषधोपचार सुरू होतील आणि कुटुंबावर ताण पडणार नाही, असे सरपंच विष्णू कोळी म्हणाले.