रेणापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी फावडेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने २७ गावांत मतदान झाले. सकाळी ७.३० वा. पासून ते दुपारी १.३० वा. पर्यंत ५६.०१ टक्के मतदान झाले. त्यात १० हजार ७९१ पुरुष व ९ हजार १४७ महिला मतदारांनी मतदान केले. दुपारी ३.३० वा.पर्यंत ७४.८० टक्के मतदान झाले. अंतिम तिसऱ्या टप्प्यात म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत १५ हजार ८२५ पुरुष व १३ हजार ९८८ महिला असे एकूण २९ हजार ८१३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८३.५२ टक्के मतदान झाले.
तालुक्यातील फावडेवाडीसह २२ सदस्य बिनविरोध निघाल्याने ८२ प्रभागांतून २०५ सदस्यांच्या निवडीसाठी ४६० उमेदवार रिंगणात होतेे. एकूण ३५ हजार ५९७ मतदार होते. त्यापैकी २९ हजार ८१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यासाठी ८८ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.
शांततेत मतदान...
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी एकूण ८३.५२ टक्के मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. रेणापूरचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कुठेही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला नाही, अशी माहिती तहसीलदार राहुल पाटील व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार गोविंद येरमे यांनी दिली.