लातूर : कोरोना रुग्णांकडून काही खाजगी रुग्णालयांनी जास्तीचे पैसे घेतले आहेत. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे. संबंधित रुग्णालयांनी ७९ लाख १० हजार २६० रुपये जास्तीचे घेतले आहेत. ते परत करावेत, अशी मागणी रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने ॲड. नीलेश करमुडी यांनी केली.
कोरोनानंतरच्या संघर्षासाठी संघर्ष समितीचा लढा सुरू असल्याचे सांगत ॲड. करमुडी म्हणाले, प्रशासनाने सर्व रुग्णालयांची माहिती न देता काही रुग्णालयांची दिली आहे. त्यातील काही रुग्णालयांनी रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेतले आहेत. जवळपास ७९ लाख १० हजार २६० रुपये जास्त घेतले असून, संबंधित हाॅस्पिटलने ते परत करावेत. सदर रुग्णालयांचे जून २०२१ पर्यंतचे ऑडिट करून रुग्णांचे जास्त आकारलेले पैसे परत मिळवून न्याय प्रशासनाने द्यावा. अशा रुग्णालयांची आयकर विभागामार्फत अधिक चौकशी करून दोषी आढळणाऱ्या रुग्णालयांवर परवानगी रद्द करण्याची कारवाई करावी व संबंधित डाॅक्टरांवर गुन्हे नोंदवावेत, असेही ॲड. करमुडे यावेळी म्हणाले. पत्रपरिषदेला समितीच्या कोअर समिटीचे सदस्य संजयकुमार सुरवसे, जिल्हाध्यक्ष हणमंत गोत्राळ, शहराध्यक्ष दीपक गंगणे, कार्याध्यक्ष विश्वास कुलकर्णी, महिला अध्यक्षा आशा अयाचित, त्रिशरण वाघमारे, रेणुका बोरा, संतोषी मोरे, संतोषी सोनवणे आदींची उपस्थिती होती.
रुग्ण हक्क संघर्ष समिती सदर पैसे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करीत राहील, असेही सांगण्यात आले.