जळकोट : तालुक्यात ७ कोटींच्या जलयोजनेची कामे सुरू असून, ती प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे तालुक्याची टँकरमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दोन - तीन बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याने जल योजनांना गती मिळाली आहे.
नळ योजना दुरुस्तीअंतर्गत तालुक्यातील भवानीनगर तांडा, सुल्लाळी, गुत्ती, पाटोदा बु., माळहिप्परगा, तिरूका, वडगाव येथे कामे सुरू असून, त्यावर ५० लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात येत आहे. तसेच तात्पुरत्या पूरक जलयोजनेअंतर्गत अतनूर तांडा, येलदरा, चेरा येथे २० लाखांची कामे सुरू आहेत.
गाव, वाडी - तांडा येथे ५२ सार्वजनिक विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक विहिरीला ७ लाख मंजूर असून, कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. सध्या सदरील गावांत सार्वजनिक विहिरींचे खोदकाम सुरू असून, त्यावर ३ कोटी ६४ रुपये खर्च करण्यात येत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत तालुक्यातील ९० शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर झाली आहे. प्रत्येक विहिरीसाठी ३ लाखांचे अनुदान असून, त्यावर २ कोटी ६० लाखांचा खर्च करण्यात येत आहे. सध्या सदरील विहिरींच्या खादकामास सुुरुवात झाली आहे. मग्रारोहयोअंतर्गत ही विहीर खोदण्यात येत असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळत आहे.
सार्वजनिक विहिरीचे काम तत्काळ पूर्ण करण्यात आलेल्या ठिकाणी विद्युत मोटार व पाईपलाईन बसवून देण्यात येईल, असे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे व ग्रामीण पाणीपुरवठ्याचे उपअभियंता संजय गर्जे यांनी सांगितले. सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यांनी आपल्या गावातील जलयोजनांची दुरुस्ती, तात्पुरती पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक विहिरींची कामे पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
टंचाईवरील खर्चात होणार बचत...
तालुक्यातील एखाद दुसरे गाव वगळता टँकरची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांची बचत होणार आहे. वाडी-तांड्यावरील नागरिकांना पाणीटंचाई जाणवू नये म्हणून गावागावात जलयोजना कार्यान्वित करण्यात येतील. त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यात येईल, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.