तालुक्यातील लिंबाळवाडी येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गावातील काही भाविक सहभागी झाले होते. दरम्यान, गावातील एका व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीनंतर स्पष्ट झाले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या संपर्कातील नऊ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. दोन दिवसात गावातील २७५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात शुक्रवारपर्यंत ९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागाचे एक पथक गावात नियुक्त करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हसनाळे व त्यांच्या पथकाने शनिवारी लिंबाळवाडीतील २२५ जणांची तपासणी केली असता, त्यात ६३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत ५०० जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोना बाधितांची संख्या १६१ वर पोहोचली आहे. लिंबाळवाडीतील सर्वांची तपासणी करण्यासाठी एक वैद्यकीय पथक आहे. गावातील ६० वर्षांपुढील कोरोनाबाधित असलेल्या २२ जणांना चाकूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येऊन तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी दिली.
दरम्यान, लिंबाळवाडी गावास तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. श्रीनिवास हासनाळे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट आदी उपस्थित होते.