अहमदपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अहमदपूर येथील नगरपालिका, इनरव्हील क्लब व लिनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन साई गणेश मिल्ट्री कॅम्प, रुद्रा पाटी येथे करण्यात आले होते. यावेळी माजी सभापती अयोध्याताई केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धा सीनियर सिटीझन ६० वर्षांवरील महिला तसेच ३० ते ५० वर्षे महिला या दोन गटांमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या पंच म्हणून मुख्याध्यापिका सुनंदा कुलकर्णी, सहशिक्षिका उषा सुडे यांनी काम पाहिले. महिला मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ६० महिलांनी सहभाग घेतला. विजयी स्पर्धकांना नगरपालिकेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले तसेच इनरव्हील क्लबतर्फे बक्षीस देण्यात आले. सीनियर सिटीझनमध्ये कॅप्टन डॉ. निर्मला कोरे, माजी सरपंच अनुसयाताई केंद्रे, कलावती भातांब्रे, प्रेमा वतनी व ग्रामपंचायत सदस्य शिवाताई शिरसाट यांनी यश मिळवले. दुसऱ्या गटात राधा रोकडे, प्रणिता बिरादार, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष डॉ. वर्षा भोसले, सारिका उगिले यांनी यश मिळवले. प्रास्ताविक नगराध्यक्ष आश्विनीताई कासनाळे यांनी केले. यावेळी डॉ. वर्षा भोसले, लिनेस क्लब अध्यक्ष नलिनी बेंबळे यांनी मनाेगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजया भुसारे यांनी केले तर अयोध्याताई केंद्रे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला इनरव्हील क्लब व लिनेस क्लबच्या सदस्य उपस्थित होत्या.