लातूर : जिल्ह्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. प्रारंभी शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती करण्यात आली होती. मात्र शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना ५० टक्के तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांना निकालाच्या कामामुळे शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्याबाबत शाळांना आदेशित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, कनिष्ठ महाविद्यालय अशा सर्व मिळून २,७१५ शाळा आहेत. यामध्ये जवळपास २० हजारांहून अधिक शिक्षक अध्यापनाचे कार्य करतात. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंदच असल्या तरी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू होता. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. शाळांमध्ये विद्यार्थी येण्याबाबत निर्णय झाला नसला तरी शिक्षकांना उपस्थितीबाबत सूचित करण्यात आले आहे. प्रारंभी शंभर टक्के उपस्थितीबाबत सुचविण्यात आले होते. मात्र शिक्षणाधिकारी यांच्या १५ जूनच्या आदेशानुसार शाळेची वेळ १० ते ४.३० पर्यंत असेल. तसेच पहिली ते नववी शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के तर दहावीची उपस्थिती १०० टक्के राहणार आहे.
जिल्ह्यातील शाळा २,७१५
जि.प. शाळा १,२८४
माध्यमिक शाळा ५७०
कनिष्ठ महाविद्यालय २००
पहिली ते बारावीचे शिक्षक २०,७००
कोट
शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार पहिली ते नववीच्या शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली आहे. तसेच दहावीच्या निकालाची तयारी सुरू असल्याने शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. याबाबत शाळांना आणि मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. - विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी
संचालकांच्या पत्रात काय
शिक्षण संचालक कार्यालयाच्या वतीने १४ जून रोजी शाळा सुरू करण्याबाबत आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार पहिली ते नववी आणि अकरावी ५० टक्के तर दहावी, बारावी १०० टक्के शिक्षक उपस्थिती
कोविड-१९ परिस्थितीमुळे शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे.
प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी शंभर टक्के उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचेही शिक्षण संचालकांच्या आदेशात म्हटले आहे.
जि.प. शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र
प्रारंभी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ११ जून रोजी शंभर टक्के उपस्थितीबाबत सूचना केल्या होत्या. मात्र शिक्षण संचालकांच्या १४ जूनच्या पत्रानंतर १५ जून रोजी नवीन आदेश शिक्षण विभागाने काढले.
त्यानुसार शाळेची वेळ १० ते ४.३० ठरवून देण्यात आली. तसेच पहिली ते नववी ५० टक्के आणि अकरावी व बारावी शिक्षक उपस्थिती शंभर टक्के करण्यात आली.
शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती १०० टक्के तर ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याच्या सूचनाही जि.प. शिक्षणाधिकारी यांच्या आदेशात करण्यात आल्या आहेत.
उपस्थितीबाबत योग्य निर्णय
सध्या पहिली ते नववीच्या शाळांचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. त्यामुळे पहिली ते नववी शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय योग्य आहे. दरम्यान, दहावीचा निकालाच्या अनुषंगाने शिक्षक तयारी करीत आहेत. - सोनेराव बेलुरे, शिक्षक
कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. सध्या जि.प. शाळाही सुरू झाल्या आहेत. पहिली ते नववी शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली. हा निर्णय चांगला आहे. - रवींद्र गोसावी, शिक्षक