शिरूर अनंतपाळ : तालुक्यात मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाला असला, तरी अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. मध्यंतरी पंधरा दिवस पावसाने ब्रेक घेतला होता. त्यामुळे १२ हजार ६०२ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या असून, आतापर्यंत ४७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३४ हजार ७०० हेक्टर्स क्षेत्र असून, त्यापैकी २९ हजार ७०० हेक्टर्स लागवडीयोग्य जमीन आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी यंदा २८ हजार ३८४ हेक्टर लागवडी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मशागतीची कामे पूर्ण करून मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरण्या करण्यासाठी व्याजी, उसनवारी करून खते, बियाणांची तयारी केली. त्यातच जून महिन्याच्या सुरुवातीलाच दोनवेळा दमदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्यामुळे पहिल्याच टप्प्यात १२ हजार ६०२ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या. परंतु मध्येच पावसाला खंड पडल्याने अनेकांनी पेरण्या थांबविल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत ४७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. अद्याप ५३ टक्के पेरण्या बाकी आहेत.
१२ हजार हेक्टरवर झाली पेरणी...
खरीप हंगामात तालुक्यात आतापर्यंत १२ हजार ६०२ हेक्टर्सवर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये सोयाबीन १० हजार ६८०, तूर १ हजार ८७१, मूग १६७, उडीद १२० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे १६ हजार हेक्टर्स क्षेत्रावर पेरण्या संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात ९४ मिलिमीटर पाऊस...
शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या पावसाची सरासरी ७५० मिलिमीटर असली तरी, तालुक्यात आतापर्यंत केवळ ९४ मिलिमीटर पाऊस पडल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.