शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्प मागील तीन- चार वर्षांपासून भरला नव्हता. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीस अडचणी येत होत्या. परिणामी, प्रकल्पाची ३८ लाख ५० हजारांची पाणीपट्टी थकीत राहिली होती. दरम्यान, यंदा परतीच्या पावसामुळे साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला. त्यामुळे मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नवीन उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने वसुली पथक सज्ज केले आहे. मार्चअखेरपर्यंत १५ लाख पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट प्रकल्प शाखेस देण्यात आले आहे.
तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्प परिसरातील गावांसाठी वरदान ठरला असून, प्रकल्पाच्या पाणीसाठ्यावर शेकडो हेक्टर्स जमीन सिंचनाखाली आली आहे. पाणीपुरवठा योजनेसह बागायती शेतीला प्रकल्पाचा मोठा फायदा होत आहे. मात्र, मागील तीन- चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडला होता. त्यामुळे पाणीपट्टी वसुली थांबली होती. मध्यम प्रकल्पाची ३८ लाख ५० हजारांची पाणीपट्टी थकीत राहिली आहे. यामध्ये मध्यम प्रकल्पावरून कार्यान्वित करण्यात आलेल्या वलांडीसह नऊ गाव पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे.
यंदा परतीच्या पावसामुळे साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला. परिणामी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर्सवर उसाची लागवड केली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या प्रकल्प शाखेच्या वतीने थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी पथक सज्ज केले आहे. या पथकास मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत १५ लाख रुपये पाणीपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. वसुली पथकातील अधिकारी, कर्मचारी वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी रात्रंदिवस थकबाकीदाराच्या घरी खेटे घालीत आहेत.
आजपर्यंत १३ लाख ६९ हजारांची वसुली...
पाणीपट्टी वसुलीसाठी प्रकल्प शाखेच्या वतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक सज्ज करण्यात आले असून, यामध्ये शाखाधिकारी प्रभाकर पाटील, कर्मचारी चंद्रहास माने, कुमार पाटील, बसवराज बिराजदार यांचा समावेश आहे. या पथकाने आजपर्यंत १३ लाख ६९ हजार रुपये वसुली केली आहे. उद्दिष्टाच्या जवळपास ९० टक्के वसुली झाली आहे.
मार्चअखेर व सणांमुळे सलग तीन सुट्या आल्याने शंभर टक्के वसुलीसाठी अडचण येत आहे. वसुलीसाठी थकबाकीदारांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे शाखाधिकारी प्रभाकर पाटील यांनी सांगितले.