सलीम सय्यद
लोकमत न्यूूज नेअवर्क
अहमदपूर : पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला असला तरी तालुक्यातील बहुतांश भागात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे ४ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित प्रकल्पांमध्ये केवळ ३६ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे लघु, मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
अहमदपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रातील लहान, मोठे प्रकल्प तहानलेले आहेत. सध्या या प्रकल्पांत ३६ टक्के जलसाठा आहे तर पावसाअभावी तालुक्यातील ४ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे अनेक गावांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. तालुक्यात मोघा लघु साठवण, थोडगा, सावरगाव थोट तलाव, तांबट सांगवी, मावलगाव, खंडाळी, हागदळ गुगदळ, नागझरी साठवण तलाव तर सोनखेड, धसवाडी, अंधोरी, ढाळेगाव, येस्तार, मोळवण, कावळवाडी, हंगेवाडी, येलदरी, कोपरा, भुतेकरवाडी, नागठाणा, उगीलेवाडी, पाटोदा, गौताळाल, काळेगाव, अहमदपूर, वाकी, तेलगाव, कौडगाव असे लघु, मध्यम व साठवण ३० प्रकल्प आहेत. मागीलवर्षी प्रकल्पाच्या क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वच प्रकल्प तुडुंब भरले होते. अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रातदेखील वाढ झाली होती. परंतु, यावर्षी जून, जुलै व अर्धा ऑगस्ट महिना उलटूनही पावसाने अहमदपूर तालुक्यात अद्याप दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला नाही. तालुक्यातील ३० लघु, मध्यम प्रकल्प व साठवण तलावांत सरासरी ३६ टक्के जलसाठा असून, ४ प्रकल्पांमध्ये अद्यापही पाणीसाठा शून्य टक्क्यांवरच आहे. प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा होण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या रिमझिम पाऊस पडत असला तरी रब्बीसाठी तालुक्यातील प्रकल्प भरणे आवश्यक आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठा अत्यल्प...
गतवर्षीच्या पावसाळ्यात अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे तालुक्यातील नागठाणा, गोताळा, धसवाडी, सोनखेड, मोघा, तेलगाव, कौडगाव, येस्तार, यलदरी, ढाळेगाव, तांबट सांगवी, हगदळ-गुगदळ, थोडगा, फुलमाळा, लांजी येथील तलावांमध्ये चांगला पाणीसाठा झाला होता. यंदा मात्र आजपर्यंत भुतेकरवाडी, गोताळा, अहमदपूर, वाकी हे चार तलाव कोरडेच आहेत.
तालुक्यातील नद्या, नाले कोरडेठाक...
सध्या तालुक्यातील नद्या-नाले कोरडेठाक असून, या पावसामुळे त्यांची तहान भागलेली नाही. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर मूग, मका व इतर पिकांवर शेतकऱ्यांची मदार असताना यावर्षी मृग नक्षत्रात पावसाचे आगमन झाले. मात्र, आतापर्यंत हा पाऊस रिमझिम पडत असल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत.
रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान...
गेल्या वीस दिवसांपासून तालुक्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे पिके सुकून जाण्याच्या मार्गावर असताना गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. रिमझिम पावसामुळे पिकात तण वाढत आहे. मजूर मिळत नाहीत व मजुरीचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असल्याचे शेतकरी वसंत पवार यांनी सांगितले.