जळकोट : संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या २४५ लाभार्थ्यांचे २८ लाख रुपये अखर्चित राहिल्याने, तहसीलदारांच्या पत्रान्वये हे पैसे बँकेच्या व्यवस्थापकांनी शासनाकडे परत पाठविले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत असून, सदरील अनुदान तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी भूमिहिन, विधवा, परित्यक्त्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या अंतर्गत लाभार्थ्यांना मासिक अनुदान दिले जाते. या अनुदानावर लाभार्थ्यांना उदरनिर्वाह, दवाखाना, औषधोपचार करण्यास मदत होते. मात्र, येथील २४५ लाभार्थ्यांनी वेळेत अनुदान बँकेतून न उचल्यामुळे हे पैसे अखर्चित राहिले.
वास्तविक पाहता, या कालावधीत कोरोनाचा संसर्ग होता. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे वाहनसेवा बंद होती. अशा परिस्थितीत काही जण आजारी पडले होते. त्यामुळे या लाभार्थ्यांना जळकोट येथे येणे शक्य झाले नाही, याशिवाय बहुतांश कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी संख्या कमीही होती. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने बहुतांश लाभार्थ्यांनी बँकेत जाणे टाळले. वेळेत अनुदानाचे पैसे न उचलल्याने ते तहसीलदारांच्या पत्रान्वये बँकेने शासनाकडे परत केले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
तीन महिन्यांत पैसे न उचलल्याने परत...
शासनाच्या नियमानुसार, अनुदानाची रक्कम तीन महिन्यांच्या आत उचलणे आवश्यक आहे. ती न उचलल्यास शासनाकडे परत करावी लागते. त्यानुसार, आम्ही बँकांना पत्र दिले होते. त्यामुळे ही रक्कम परत करण्यात आली आहे.
- संदीप कुलकर्णी, तहसीलदार.
तहसीलदारांच्या पत्रानुसार पैसे परत...
तहसीलदारांच्या पत्रानुसार आपण ही रक्कम परत केली आहे. लाभार्थ्यांनी ठरावीक कालावधीत पैसे उचलणे आवश्यक आहे, परंतु ते न उचलल्याने ही कार्यवाही करावी लागली आहे. २४५ लाभार्थ्यांचे जवळपास २८ लाख परत केले आहेत, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक लोखंडे यांनी सांगितले.
सहानुभूतीपूर्वक विचार करावा...
निराधारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाकडे परत पाठविलेले अनुदानाचे पैसे वाटप करावे. त्यांना नवीन फॉर्म भरण्यास सांगण्यात येऊ नये, अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संग्राम पाटील हसुळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, बाजार समितीचे संचालक गजानन दळवे पाटील, दिलीप कांबळे, खादरभाई लाटवाले, गोविंद माने, आयुब शेख यांनी केली आहे.