अहमदपूर : कोरोनावर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाकडून लसीकरणावर भर देण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यात आतापर्यंत ५५ हजार ५०० जणांनी कोविड लस घेतली असून, त्याची २६ अशी टक्केवारी आहे.
कोविडची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडून लसीकरणावर भर देण्यात आला. त्यानुसार आरोग्य प्रशासनाने शहरासह ग्रामीण भागात जनजागृती करून लसीकरण करण्यास सुरुवात केली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. यात सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ ते ६० तसेच ६० वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच एप्रिल महिन्यात
१८ ते ४४ गटातील लसीकरणाला परवानगी देण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे १६ जानेवारी ते २३ जुलैपर्यंत तालुक्यात ५५ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण झाले. यात ४३ हजार ६६७ नागरिकांनी पहिला डोस, तर ११ हजार ९०० नागरिकांनी दुसरा डोस घेतला. दरम्यान, केंद्र शासनाने २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरणास परवानगी दिली. त्यानुसार तालुक्यात २२ जूनपासून या गटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली.
लसीकरणात तरुणांचा सहभाग...
कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढली होती. मे महिन्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. तेव्हा ऑनलाइन रजिस्ट्रेशन झालेल्यांना लस देण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच हे लसीकरण बंद झाले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. तालुक्यातील युवकांचा लस घेण्यावर भर आहे.
लसीकरण करून घ्यावे...
कोविड लस ही खूप परिणामकारक, प्रभावी ठरलेली आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. संभाव्य तिसरी लाट ऑगस्ट, सप्टेंबर यादरम्यान येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी शासन नियमांचे पालन करावे. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट बसविण्याचे काम चालू आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.