लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : राज्याच्या क्रीडा धोरणातील उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील ६ खेळाडूंना आजतागायत २४ लाखांची मदत स्पर्धा खर्च, औषधोपचार खर्च व क्रीडा साहित्य या माध्यमातून मिळाली आहे. राज्यात लातूर हा ही योजना राबविणारा एकमेव जिल्हा ठरला आहे.
केंद्र शासनाने उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निश्चित करण्यासाठी सुधारणा केली. या धोरणांतर्गत नफा कमविणाऱ्या कंपनीने त्यांच्या नफ्याच्या २ टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणणे गरजेचे आहे. यात अनुसूचित ग्रामीण खेळ, राष्ट्रीय स्तरावरील मान्यतापात्र खेळ, पॅराऑलिम्पिक खेळ आणि ऑलिम्पिक खेळाच्या संवर्धनाकरिता प्रशिक्षण देणे ही बाब अंतर्भूत केली होती. त्यानुसार लातूर जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली आहे. यात क्रीडा सुविधा, उदयोन्मुख खेळाडूंना अर्थसाह्य, प्रशिक्षण, खेळाशी निगडीत वैद्यकीय सुविधा यासह शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्याची योजना आहे. यात लातुरात आजतागायत सहा खेळाडूंना लाभ देण्यात आला आहे. यामध्ये क्रिकेटपटू सौरभ जांभळे, विनोद आडे, नेमबाज जागृती चंदनकेरे, बेसबॉलपटू ज्योती पवार, कुस्तीपटू निखिल पवार व लक्ष्मी पवार यांना विविध योजनांतून अर्थसाह्य करण्यात आले आहे. एकंदरित, या योजनेमुळे लातूरच्या खेळाडूंना आधार मिळाला आहे.
खेळाडूंना घेतले दत्तक
या योजनेंतर्गत क्रिकेट, कुस्ती खेळातील खेळाडूंना दत्तक घेण्यात आले आहे. त्यांच्या दैनंदिन सरावासाठी दरमहा मानधनही दिले जाते. यात क्रिकेटपटू सौरभ जांभळे याला दरमहा १० हजार रुपये, विनोद आडे याला दरमहा १८ हजार रुपये, कुस्तीपटू निखिल पवार याला ५ हजार रुपये तर लक्ष्मी पवार हिला प्रतिमहा ७ हजार रुपये देण्यात येतात. यासह सौरभ जांभळे याच्या खांद्याच्या शस्त्रक्रियेसाठी १ लाख ६५ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. नेमबाज जागृती चंदनकेरे हिला रायफलसाठी १ लाख ९० हजार रुपये तर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय निवड चाचणीसाठी मानधन देण्यात येत आहे. बेसबॉलपटू ज्योती पवार हिला बेसबॉल साहित्यासाठी ६० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
लातूरच्या खेळाडूंना झाला फायदा
सीएसआर योजना राबविणारा राज्यातील लातूर हा एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे या माध्यमातून लातूरच्या खेळाडूंना विविध क्रीडाविषयक बाबींसाठी अर्थसाह्य मिळाले आहे. या योजनेमुळे लातूरच्या अनेक खेळाडूंना फायदा मिळाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरजवंत खेळाडूंना यापुढेही या माध्यमातून अर्थसाह्य करण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंनी या योजनेचा भावी काळात लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.