निलंग्याला २४ तास पाणीपुरवठा व्हावा म्हणून १०५ कोटींची योजना मंजूर करून ती पूर्णत्वास गेली आहे. तिची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, माजी सभापती शरद पेठकर, चेअरमन दगडू साळुंके, नगरसेवक शंकर भुरके, पं. स. चे माजी सभापती अजित माने, शेषेराव ममाळे, मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील, जीवन प्राधिकरणचे खरोसेकर, आर. एस. पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष शिंगाडे म्हणाले, माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या पाठपुराव्यामुळे शहरास २४ तास पाणीपुरवठा योजना सुरू करता आली असून ज्या माकणी धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो, ते धरण आणि त्यासाठी आवश्यक असणारी योजना माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्यामुळे शक्य झाली होती. यावेळी शहरातील पांचाळ कॉलनीत असलेल्या बहुतांश घरांमध्ये २४ तास पाणीपुरवठ्याची चाचणी घेण्यात आली.
राज्यातील पहिली पालिका...
माजी मंत्री आ. निलंगेकर म्हणाले, निलंगा ही ‘क’ वर्गाची नगरपालिका असूनही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर २४ तास पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून अशाप्रकारची योजना सुरू करणारी निलंगा पालिका महाराष्ट्रातील पहिलीच आहे. प्रत्येक नळाला मीटर बसविण्यात येत आहेत तरीही नागरिकांनी पाण्याची बचत करावी. लातूर आणि पाणीटंचाई हे समीकरण जुळलेले असले तरी लातूरपासूनच काही अंतरावर असलेल्या निलंगा शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्याचे काम करून दाखविलेले असून लवकरच लातुरातही करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.