शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे रूपडे पालटण्यासाठी ३५ शाळांची बाला उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी २३ शाळांची उपक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू असून, लोकसहभागातून निधीची उपलब्धता झाल्याने शाळेचे रुपडे पालटले आहे. दरम्यान, बाला उपक्रमासाठी पंचायत समितीच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळाही घेण्यात आली आहे.
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळेतील प्रत्येक वस्तूवर विद्यार्थ्याची नजर पडली तर त्यातून गणित, विज्ञान, इंग्रजीसह सर्व विषयांचे सहज आकलन व्हावे. खेळता खेळता शिक्षणाचे धडे गिरवले जावेत म्हणून शिक्षणाशी निगडित असणाऱ्या २९ मुद्यांवर आधारित रंगरंगोटी, प्रतिकृती, माॅडेल, रॅम्प, झोपाळा, आकर्षक चित्राकृती, घसरगुंडी, लपंडाव भिंत आदी साधनांची निर्मिती करून शालेय परिसर आकर्षक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६१ शाळांपैकी ३५ शाळांची बाला उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. या उपक्रमात निवड झालेल्या शाळांमध्ये लवकर कामकाज सुरू व्हावे, म्हणून गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक कार्यशाळा घेण्यात आली आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिल पागे, विस्तार अधिकारी चोपडे, केंद्रप्रमुख शिवाजी एरंडे, नाईकवाडे यांची उपस्थिती होती.
लोकसहभाग, शिक्षकांच्या मदतीने काम...
जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्रत्येक भिंत बोलकी व्हावी म्हणून शिक्षक कामाला लागले आहेत. शाळेची प्रतिमा बदलण्यासाठी अनेक शिक्षकांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांचा निधी मुख्याध्यापकांकडे दिला आहे. रंगरंगोटीचे काम मोठ्या प्रमाणात करावे लागत असल्याने लोकसहभागातून निधीही संकलित केला जात आहे. - अनिल पागे, गटशिक्षणाधिकारी.
लपंडावाच्या भिंतीचे आकर्षण...
बाला उपक्रमांतर्गत निवड करण्यात आलेल्या ३५ शाळांपैकी २३ शाळांनी उपक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून, ओटे बांधणे, झोपाळे बसविणे, प्रतिकृती तयार करणे, रंगरंगोटी करणे, रॅम्प, लपंडाव भिंत आदी कामे सुरू आहेत. विद्यार्थांना लपंडाव खेळणे आवडते. त्यामुळे लपंडाव भिंतीचे सर्वांनाच आकर्षण ठरले आहे. अंकुलगा राणी, डिगोळ या शाळांनी उपक्रमाची अंमलबजावणी केली आहे.