चापोली : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२० मध्ये पहिले लॉकडाऊन झाले. त्यामुळे इयत्ता पहिली ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झाले. दरम्यान, पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेले तालुक्यातील २ हजार ९६८ विद्यार्थी प्रत्यक्षात एकही दिवस शाळेतील वर्गात न जाता दुसरीच्या वर्गात गेले आहेत.
गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरु असून त्याचा शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शाळा सुरु असल्या तरी प्रत्यक्षात वर्ग बंद असून ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरु आहे. पहिल्यांदाच बहुतांश विद्यार्थ्यांना मोबाईल, संगणकावर शिक्षण घ्यावे लागले आहे. इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शब्दाची ओळख नसतानाही ऑनलाईन अभ्यासक्रमात गुंतावे लागले. शाळा, वर्गमित्र, शिक्षक यातून बाराखडी, अक्षर ओळख, शाळेचे वातावरण या बाबींपासून पहिलीच्या विद्यार्थ्यांना मुकावे लागले. एकही दिवस शाळेत न जाता थेट दुसरीच्या वर्गात हे विद्यार्थी गेले आहेत.
गेल्या वर्षी चाकूर तालुक्यात मराठी माध्यमाचे २ हजार ४६९, उर्दू माध्यमाचे १५४, इंग्रजी माध्यमाचे ३४५ असे एकूण २ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. आता हे सर्व परीक्षा न देता उत्तीर्ण होऊन दुसरीच्या वर्गात गेले आहेत. दरम्यान, या परिस्थितीमुळे पालकांची चिंता वाढली आहे.
शहरी भागातील काही पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिलीच्या वर्गातील शैक्षणिक पाया मजबूत न झाल्यामुळे ते पूर्ण कसे करतील, अशी चिंता पालकांना लागली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्षात वर्ग भरतील की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
शिक्षकांवर वाढणार ताण...
इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमाची तोंड ओळख करुन घेत विद्यार्थी दुसरीच्या वर्गात गेले आहेत. त्यामुळे या वर्गाचा अभ्यासक्रम सुरू करताना शिक्षकांपुढे विविध प्रश्न निर्माण होत आहेत. शिक्षकांना प्रथम पहिलीच्या अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी शिकविल्यानंतर दुसरीचा अभ्यासक्रम सुरु करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडणार आहे.
ब्रिज कोर्सचा उपक्रम...
गतवर्षी मार्चमध्ये कोविडमुळे लॉकडाऊन झाले आणि नवीन शैक्षणिक वर्षाला जूनपासून सुरूवात झाली. त्यामुळे गतवर्षी पहिलीच्या वर्गात प्रवेश न करता विद्यार्थ्यांना दुसरीत जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण विभागाने ब्रिज कोर्सचा उपक्रम काढला आहे, असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय आलमले यांनी सांगितले.