मुरुड ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या या कोविड सेंटरमध्ये सध्या १३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सेंटरमधील रुग्णांची व्यवस्था व देखभाल ग्रामपंचायत करीत आहे, तसेच शासनाकडून मिळणारी औषध कमी असल्यास त्याचा पुरवठाही ग्रामपंचायत करून देत आहे, तसेच सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त १० खाटा सुरू करण्यात येत असून, सेंट्रल ऑक्सिजन लाइनचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती व्यवस्था ग्रामपंचायतद्वारे पूर्ण केली जाईल, अशी माहिती सरपंच अभय नाडे यांनी दिली.
गुरुवारी दहा दिवसांचे विलगीकरण पूर्ण करणाऱ्या पहिल्या दहा रुग्णांची गृह विलगीकरणासाठी सुट्टी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व रुग्णांना वृक्ष रोप भेट देऊन ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित करणारा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी मुरुड ग्रामपंचायतचे सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, डॉ. दिनेश नवगिरे, डॉ. बजरंग खडबडे, डॉ. मदन सूर्यवंशी, ग्रामसेवक शेख, जि.प. मुख्याध्यापक दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य नीलेश नाडे, नवनाथ कोपरकर आदी उपस्थित होते.
तसेच मुरुड येथील प्रतिष्ठित व्यापारी सुराणा यांनी सामाजिक जाणिवेतून त्यांच्या मातोश्री स्व. विजयाबाई चांदमलजी सुराणा यांच्या स्मरणार्थ मुरुड कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांची दोन वेळेच्या मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती सरपंच नाडे यांनी दिली.