लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा रद्द झाल्याने मूल्यमापन कोणत्या पद्धतीने होणार, वैद्यकीय, अभियांत्रिकीसह पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश कसे होणार, असा प्रश्न बारावीचे विद्यार्थी व पालकांमधून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात जवळपास ३४ हजार ५३९ विद्यार्थी बारावी परीक्षेसाठी बसले होते. दरम्यान, राज्य शासनाने बारावीची परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे पुढील प्रवेश कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच कला क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. दरवर्षी बारावीच्या मेरिटवर बी. एस्सी., बी. ए., बी. कॉम. या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. मात्र, परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे गुणांकन कसे करणार, मूल्यमापनाची पद्धत कशी राहणार, गुणवंतांना न्याय मिळेल का, असे विविध प्रश्न पालक, विद्यार्थ्यांमधून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, राज्य शासनाने बारावीच्या मूल्यमापनासाठीचे धोरण तत्काळ जाहीर करावे आणि विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव कमी करावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांमधून होत आहे.
प्राचार्य म्हणतात
शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पदवी प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. दरम्यान, सध्यातरी याबाबत सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. विद्यापीठ किंवा महाविद्यालय स्तरावर सीईटी घेतल्यास प्रवेश प्रक्रिया सुलभ होईल. - प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे
गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी बारावी परीक्षेचा अभ्यास करत आहेत. मात्र, परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी राज्यस्तरावर किंवा विद्यापीठ स्तरावर स्वतंत्र सीईटी झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल.
- प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड
विद्यार्थी म्हणतात
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु आहेत. परीक्षेचे दडपण होते. मात्र, परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे गुणवंतांना न्याय मिळेल का, असा प्रश्न आहे. मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात. - विद्यार्थी
दहावीबरोबर बारावीची परीक्षाही रद्द केली आहे. पदवीचे प्रवेश कसे होणार, याबद्दल अद्यापही साशंकता आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ प्रवेशाची नियमावली जाहीर करावी किंवा राज्यस्तरावर एकच सीईटी घ्यावी. - विद्यार्थिनी
मूल्यमापन कसे करणार
बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार, त्यांना प्रवेश कसे देणार, याबाबत नियमावली जाहीर करण्याची गरज आहे. राज्यस्तरावर किंवा महाविद्यालय स्तरावर सीईटी घेतल्यास प्रवेशाचा तिढा सुटू शकतो. - प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे
गेल्या दीड वर्षांपासून मुले घरीच अभ्यास करत आहेत. बारावीची परीक्षा रद्द झाली, हा निर्णय स्वागतार्ह आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. दरम्यान, पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत धोरण जाहीर करावे. - प्रशांत कुलकर्णी
जिल्ह्यातील एकूण बारावीचे विद्यार्थी ३४,५३९
मुले १७,८२०
मुली १६,७७९
बारावीनंतर विविध अभ्यासक्रमाच्या संधी
बारावीचे वर्ष हे विद्यार्थी जीवनाला कलाटणी देणारे असते. त्यामुळे विद्यार्थी कठोर मेहनत घेत असतात. बारावीनंतर सायन्सचे विद्यार्थी एमबीबीएस, बीएचएमएस, बी. फार्मसी, डी. फार्मसी, एम्स तर इंजिनिअरिंग शाखेचे विद्यार्थी आयआयटी, एनआयटी, जीपमेर या शाखांना पसंती देतात.
तर काही विद्यार्थी बी. एस्सी., बी. कॉम., आर्टस, हॉटेल मॅनेजमेंट अशा इतर शाखांमध्ये प्रवेश घेतात. बारावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेशाची लगबग सुरू असते. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटामुळे परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील प्रवेश कसे असणार, मूल्यमापन कसे होणार, याबाबत अजूनही सूचना मिळालेल्या नाहीत.