शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपडे पालटण्यासाठी ३५ शाळांची बाला उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १२ शाळांची उपक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. कोराेनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्यानंतर विद्यार्थी शाळेत उपस्थित झाल्यानंतर ते आश्चर्यचकीत होणार आहेत, अशा पद्धतीने कामकाज सुरू आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळेतील प्रत्येक वस्तूवर विद्यार्थ्यांची नजर पडली तर त्यातून गणित, विज्ञान, इंग्रजी यासह सर्व विषयांचे ज्ञान लक्षात यावे, खेळता-खेळता शिक्षणाचे धडे मिळावेत म्हणून शिक्षणाशी निगडित असणाऱ्या प्रमुख २९ मुद्द्यांवर अधारित रंगरंगोटी, प्रतिकृती, माॅडेल, रॅम्प, ॲम्पिथिएटर, झोपाळा आदी साधनांची निर्मिती करून शालेय परिसर आकर्षक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६१ पैकी ३५ शाळांची पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने निवड केली. निवड करण्यात आलेल्या शाळांची बाला उपक्रमात अग्रेसर राहण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे.
तालुक्यातील या शाळांची निवड...
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा आहेत. त्यापैकी शिरुर अनंतपाळ केंद्रीय प्राथ. शाळा, कन्या शाळा, भोजराजनगर शाळा, दैठणा जिल्हा परिषद शाळा, तळेगावातील केंद्रीय प्रा. शाळा, डिगोळ येथील जिल्हा परिषद प्रा. शाळा, साकोळची कन्या शाळा, उत्तर शेंद येथील प्राथ. शाळा, साकोळची प्रशाला, येरोळ प्रशाला, उजेडची केंद्रीय शाळा, कांबळगाची केंद्रीय शाळा, लक्कड जवळगा येथील प्राथ. शाळा, शिवपूर प्राथ. शाळा, कळमगाव शाळा, बाकली प्राथ. शाळा, अंकुलगा राणी येथील प्राथ. शाळा, गणेशवाडी शाळा, हिप्पळगाव, अंकुलगा (स.), रापका शाळा आदी ३५ शाळांची निवड करण्यात आली आहे.
प्रभावी अंमलबजावणी...
तालुक्यातील बाला उपक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या ३५ शाळांपैकी १२ शाळांनी उपक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. काही ठिकाणी ओटे बांधणे, झोपाळे बसविणे, प्रतिकृती तयार करणे, रंगरंगोटी करणे, रॅम्प, ॲम्पिथिएटर तयार करणे सुरू आहे. अंकुलगा राणी आणि डिगोळ या शाळांनी उपक्रमाची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे शाळांचे अंतरंग आणि बाह्यरंग बदलून गेले आहे. विद्यार्थीही शाळेत येण्यासाठी आतूर झाले आहेत.