लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने घटत असून, शुक्रवारी २०१३ चाचण्यांमध्ये फक्त १२ बाधित रुग्ण आढळले आहेत. आता बांधितांचा आलेख ९० हजार ७७०वर पोहोचला असून, यातील ८८ हजार २७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत फक्त ९१ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, शुक्रवारी एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी ८७७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात फक्त सहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर १,१३७ व्यक्तींची रॅपिड चाचणी करण्यात आली, त्यात सहा रुग्ण बाधित आढळले. दोन्ही चाचण्या मिळून १२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने घटत असल्याने दिलासा मिळाला असून, आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ६१० दिवसांवर गेला आहे. शिवाय अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. प्रयोगशाळेत घेण्यात आलेल्या चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट ०.७ टक्के आहे तर रॅपिड चाचणीमधील पॉझिटिव्हिटी रेट ०.६ टक्के आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक बाब आहे.