अहमदपूर : अपघात अथवा आपत्कालिन परिस्थितीतील गंभीर रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा जीवनदान देणारी ठरली आहे. अहमदपूर तालुक्यात आतापर्यंत २ हजार २३ गंभीर रुग्णांना या सेवेमुळे वेळेवर सुखरुप रुग्णालयात पोहोचता आले आहे.
राज्य शासनाने ७ एप्रिल २०१४ पासून आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली. अपघाताच्या ठिकाणावरून कोणीही १०८ या क्रमांकावर फोन केल्यावर तातडीने रुग्णवाहिका येऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल करीत आहे. कोरोनाच्या संकटात तर अधिक ताण वाढला आहे. तालुक्यात दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका असून, त्यात वैद्यकीय पथकासह चालक मार्च २०२० ते एप्रिल २०२१ या १३ महिन्यात २ हजार २३ गंभीर व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारार्थ सुखरूप पोहोचविले आहे.
ग्रामीण असो की शहरी भाग, रात्री-अपरात्री काही मिनिटांतच रुग्णवाहिका उपलब्ध होऊन रुग्णाला उपचारासाठी तात्काळ दाखल करीत आहे. कोरोनाच्या संकटात १०८ ही रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरली आहे. रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि चालकास रुग्णांची हाताळणी, रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
बाधितांबरोबरच त्यांच्या संपर्कातील कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्यास या रुग्णवाहिकेतून नेण्यात येते. तसेच उपचारानंतर बरे झालेल्यांनाही याच रुग्णवाहिकेतून सेवा मिळते.
कोरोनासह अन्य आजारांच्या १५३८ जणांना सेवा...
गेल्या १३ महिन्यांत तालुक्यातील
रस्ते अपघातात जखमी- १३६, मारहाणीत जखमी- २२, जळित रुग्ण- ३, उंच ठिकाणाहून पडलेले- ६, विषबाधा- ४५, प्रसूती- २७०, वीज पडलेला-१, मोठ्या अपघातातील जखमी-१, कोरोना व इतर आजाराचे १५३८ अशा एकूण २ हजार २३ रुग्णांना सुखरूप पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ. संदीप राजहंस यांनी दिली.
कोविड संकटात सर्वाधिक सेवा...
कोरोनाग्रस्तांना सेवा देण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेचा वापर होत आहे. कोरोना संशयितांची तपासणी, क्वारंटाईन करण्यासाठी संशियतास ने- आण करण्यासाठी ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरत आहे. १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर अवघ्या काही वेळात ही रुग्णवाहिका उपलब्ध होत आहे. रुग्णवाहिकेत डॉ. उबेद जाहागिरदार, चालक राहुल हुडगे, चालक गव्हाणे म्हणाले, मार्च २०२० पासून २४ तास सेवा देत आहेत.
तुटपुंज्या वेतनावर काम...
या रुग्णवाहिकेवरील डॉक्टर, चालक हे आपल्या परिवारापासून दूर राहून २४ तास रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र, त्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. एखादा पॉझिटिव्ह निघाल्यास त्यांना नातेवाईकांपासून दूर राहावे लागते. मात्र, रुग्णवाहिकेतील सर्व पथक कुटुंबातील सदस्याप्रमाणे रुग्णाची काळजी घेतात. शासनाने वेतनवाढ करावी, अशी मागणी होत आहे.