लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील लेंडी नदीला मागील आठवड्यात आलेल्या पुराच्या पाण्यासोबत १० टन कचरा वाहून येऊन पुलाच्या पाईपला अडकला होता. त्यामुळे नदीवरील पुलाला धोका निर्माण झाला होता. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने जेसीबी मशीनच्या मदतीने हा कचरा काढण्यात आला. त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन पुलाचा धोका दूर झाल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यातील घरणी, मांजरा या दोन मोठ्या नद्यांनंतर दैठणा येथील लेंडी नदी आहे. नदीचे पात्र घरणी, मांजरा नद्यांप्रमाणे रूंद आहे. त्यामुळे या नदीवर कमानीचा मोठा पूल बांधणे आवश्यक होते. परंतु, नदीवर पाईपचा पूल बांधण्यात आला असून, पुलाची उंचीही कमी आहे. त्यामुळे नदीला पूर आल्यानंतर तासनतास पुलावरून पुराचे पाणी वाहते. त्यामुळे वाहतूक ठप्प होते.
मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने नदीला पूर येऊन पुराच्या पाण्यासोबत जवळपास दहा टन कचरा वाहून आला होता. हा कचरा दैठणा - शिरूर अनंतपाळ या प्रमुख जिल्हा मार्गावर बांधण्यात आलेल्या पुलाला अडकून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले होते. यामुळे धोका निर्माण झाला होता. ही बाब सरपंच लक्ष्मीबाई बिरादार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने योगेश बिरादार, उपसरपंच सीताराम पाटील आदींच्या मदतीने जेसीबी मशीनद्वारे पुलाला अडकलेला कचरा तातडीने हटवला. त्यामुळे पुलाचा धोका टळला असून, त्यावरील रहदारी सुरळीत झाली आहे.
पाच वर्षांपूर्वी वाहून गेला होता पूल...
साकोळ मध्यम प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर या नदीचे पाणी गावकुसापर्यंत थांबते. त्यामुळे येथे पाईपच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु, पाच वर्षांपूर्वी परतीच्या पावसाने लेंडी नदीला पूर येऊन पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा पुलाच्या पाईपमध्ये मोठ्या प्रमाणात अडकल्याने पूलच वाहून गेला होता. त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा येथे पूर्वीसारखाच पाईपचा पूल बांधण्यात आला. याठिकाणी अडकलेल्या कचऱ्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला होता.
नदीवर कमानीच्या उंच पुलाची गरज...
दैठणा येथील लेंडी नदीचे पात्र रूंद असल्यामुळे आणि साकोळ मध्यम प्रकल्पाचे बॅक वाॅटर थांबत असल्यामुळे येथे कमानीचा उंच पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून काही वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु, अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही.
मोठ्या पुलाचे अंदाजपत्रक...
दैठणा येथील लेंडी नदीवर कमानीच्या उंच पुलाचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाला मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळताच मोठा पूल बांधण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र पवार यांनी सांगितले.