कणेरी : राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने इंटरनेट सुविधा देण्यासाठी लवकरच प्रयत्न करणार असून, आदर्श सरकारी शाळा करण्यासाठी ‘माझं शिक्षण, माझं भविष्य’ असे धोरण ठरवले आहे. यापुढे हे धोरण राबविणार असल्याचे मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.
त्या कणेरीवाडी (ता. करवीर) येथे जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर, कणेरीवाडी या शाळेच्या लोकसहभाग व देणगीतून साकारलेल्या डिजिटल शाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.
यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले, जगासमोर कोरोनासारख्या रोगाचे आव्हान होते. सर्व शाळा बंद होत्या, अशावेळी कणेरीवाडी गावाने या आव्हानात्मक प्रसंगातही आपला वारसा जपला. जिल्हा परिषद सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य यांनी या वेळेचा सदुपयोग करून घेत शाळेचे डिजिटल शाळेमध्ये रुपांतर केले.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कणेरीवाडी डिजिटल शाळेला ग्रामस्थांचे पाठबळ मिळाले हे काम कौतुस्कापद आहे. डिजिटल शाळेच्या माध्यमातून या शाळेचे नाव राज्यात गेले आहे. यावेळी मंत्री वर्षा गायकवाड यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्या सरिता खोत, कणेरीवाडीच्या सरपंच शोभा खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, देणगीदार तसेच मान्यवरांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमार मोरे, उपाध्यक्ष रवींद्र खोत, सदस्य उत्तम वारके, आदींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रदीप केसरकर, राम कदम, मुख्याध्यापक राहुल ढाकणे तसेच मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कदम यांनी केले तर प्रदीप केसरकर यांनी आभार मानले.
१६ कणेरीवाडी डिजिटल
फोटो कॅप्शन - कणेरीवाडी (ता. करवीर) येथे जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर, कणेरीवाडी या शाळेच्या लोकसहभाग व देणगीतून साकारलेल्या डिजिटल शाळेच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो --- त्रिशुल पाटील, कणेरी