कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत दलित वस्तीच्या निधीचा प्रश्न आता शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यापर्यंत गेला आहे. दुधवडकर हे आता पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी या निधी वितरणाबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.
समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांना दलित वस्ती निधीपैकी अतिरिक्त निधी देण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी सदस्यांनाही चांगला निधी दिला. मात्र सासने या सभापती म्हणून जादा निधीसाठी आग्रही आहेत. यावरून दोघात शाब्दिक चकमक उडाली होती.
त्यामुळे सासने यांनी हा मुद्दा दुधवडकर यांच्यासमोर मांडला आहे. तेव्हा दुधवडकर यांनी पालकमंत्र्यांशी आपण चर्चा करतो असे त्यांना सांगितले. तर सासने यांनी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्याही कानावर ही बाब घातली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या सभापती सासने एकाकी पडल्याचे चित्र आहे. कारण सदस्यांना चांगला निधी मिळाल्यामुळे त्यांना पालकमंत्र्यांची भूमिका योग्य वाटत आहे. त्यामुळेच सभापती म्हणून तुम्ही सदस्यांना जादा निधी मिळावा यासाठी कधी भांडलात अशी विचारणा सदस्यच सासने यांना करू लागले आहेत.