कोल्हापूर : दुचाकीला टेकून उभा राहिला म्हणून त्याला दगडाने मारहाण करून जखमी करण्याचा प्रकार घडला. धनंजय दत्तात्रय कोळी (वय २९, रा. भारती विद्यापीठासमोर, कदमवाडी) असे जखमीचे नाव आहे. ही घटना लिशा हॉटेलनजीक एटीएम सेंटरनजीक घडली. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनंजय कोळी हे लिशा हॉटेलनजीक रस्त्याकडेला उभ्या दुचाकीला टेकून मित्राबरोबर बोलत होते. यावेळी एक अज्ञात युवक तेथे आला. त्याने ‘माझ्या गाडीला टेकून का उभारलास?’ असा जाब विचारून कोळी यांच्या गालावर ठोसा मारला. तसेच शिवीगाळ करीत दगडाने मारून जखमी केले. त्यानंतर, तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. या हल्ल्यामध्ये धनंजय कोळी हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
(तानाजी)