कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करून तरुणाने सातत्याने मानसिक त्रास दिल्याने बाल लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे सकलेन समीर मुजावर (वय १९, रा. बागवान गल्ली, रविवार पेठ) याला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील ॲड. अमिता कुलकर्णी यांनी या खटल्याचे काम पाहिले.
आरोपी सकलेन मुजावर हा जानेवारी २०१८पासून अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी व जवळीक साधण्यासाठी तो सतत तिच्या घरासमोर थांबत होता. याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी त्याची समजूत काढली, तरीसुद्धा तो ऐकत नव्हता. या रोजच्या त्रासाला कंटाळून मुलीने गळफास लावून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नातेवाईकांनी तिला वेळीच उपचार देत बरे केले. मुलीच्या पालकांनी याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एस. के. पवार यांनी याप्रकरणी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी सहा साक्षीदार तपासले. यावेळी समोर आलेले पुरावे, सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश महात्मे यांनी आरोपीला शिक्षा सुनावली.
फोटो : २६०३२०२१-कोल-सकलेन मुजावर (आरोपी)