इचलकरंजी : अन्नाच्या शोधात आपल्या पिल्लांना घेऊन एक कुत्री इकडून तिकडे भटकत होती. यावेळी अचानक तोल जाऊन कुत्री आडात पडली. जिवाच्या आकांताने जोरजोरात भुकत होती. तिची पिल्लेही भुंकू लागली. सदरची घटना समजताच परिसरातील काही तरुणांनी तीन तासांच्या अथक परिश्रमाने त्या कुत्रीला आडातून बाहेर काढले. राजवाडा चौक परिसरात असलेल्या सरकारी तालमीतील आडामध्ये ही घटना घडली होती.
सध्या कोरोना महामारीमुळे शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ विक्रीचे हातगाडेही बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे जेवणासाठी हाल होत आहेत. मुक्या प्राण्यांनाही याचा त्रास होत आहे. अन्नासाठी आपल्या पिल्लांना घेऊन जात असताना राजवाडा चौक परिसरातील सरकारी तालमीतील आडामध्ये कुत्री पाय घसरून पडली. आडाला पायऱ्या नसल्यामुळे तिला बाहेर पडता येईना. यावेळी कुत्री जोराने भुंकू लागली.
दरम्यान, तालमीचे वस्ताद जाधव त्याठिकाणी गेले असता, ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते, प्राणीमित्र व तरुण त्या कुत्रीला बाहेर काढण्यासाठी धडपड करू लागले; मात्र काही केल्या त्यांच्या प्रयत्नांना लवकर यश मिळेना. शेवटी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर परशराम सांगावे, प्रमोद बचाटे, रोहित सांगावे, मंथन हणबर, ओंकार शेलार, आकीप शेख, रफिक अत्तार यांनी त्या कुत्रीला आडातून बाहेर काढले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यांच्या या कार्याचे शहरात दिवसभर कौतुक होत आहे.
फोटो ओळी
०४०५२०२१-आयसीएच-०१
०४०५२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत आडात पडलेल्या कुत्रीला तीन तासांच्या प्रयत्नानंतर तरुणांनी बाहेर काढून तिला जीवनदान दिले.