कोल्हापूर : मोठ्या भावाशी असलेल्या वादाचा राग मनात धरुन लहान भावाला विनाकारण काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार लक्षतीर्थ वसाहतीमध्ये घडला. या मारहाणीत स्वरुप संजय शेळके (वय २०, रा. रेडेकर गल्ली, लक्षतीर्थ वसाहत) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी चौघांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वरुप शेळके हा गुरुवारी रात्री उशिरा जेवण करुन मित्रासमवेत गप्पा मारत लक्षतीर्थ वसाहतीमधील आण्णासाहेब शिंदे विद्यालयनजीक कठड्यावर बसला होता. यावेळी त्याचा भाऊ सम्राटसोबत असलेल्या वादातून आकाश लाखे, अक्षय लाखे, रोहित कदम, विश्वजित कटके (सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत) या चौघा संशयितांनी स्वरुपसोबत वाद उकरुन काढला. त्यानंतर चौघांनी त्याला काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. स्वरुपने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.