यवलूज ते काटेभोगावमार्गे कोकणात जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ कायम मोठ्या प्रमाणात सुरू असते. या परिसरात केबल कंपनीने केबल बुजवून नेण्याकामी चार फूट खोल रस्ता खुदाई केलेल्या साईडपट्ट्यांचे मोठे नुकसान केले होते. पावसातच त्या वरचेवरच बुजविल्याने अनेक ठिकाणी वाहने रुतून अपघात होत होते. संबंधित ठेकेदारांकडून केबलसाठी चार फुटांची खोल चर काढली होती; पण काम झाल्यावर तो बुजवण्यासाठी वरवरची माती टाकली होती. शिवाय त्यावर रोलिंगही करण्यात आलेले नव्हते. शेतकऱ्यांना शेतीपाण्यासाठी पाईप खुदाई करताना सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे अपघात जबाबदारीची लेखी हमी घेण्यात येत असते. मात्र खासगी कंपनीच्या केबलसाठी सार्वजनिक रस्त्यांच्या केलेल्या नुकसानीला कोणीतरी वाली असला पाहिजे. या उद्देशाने नुकतेच युवासेना पन्हाळा तालुकाप्रमुख जयराम पोवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र आंदोलन उभे करणार असल्याचे निवेदनाचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध केले होते. संबंधित खात्याने याची गांभीर्याने दखल घेत खराब रस्त्यांच्या साईडपट्ट्यांच्या दुरुस्तीकामास ताबडतोब सुरुवात केली आहे. त्यामुळे भागातील नागरिकांतून व वाहनधारकांतून ‘लोकमत’ व युवासेना पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
फोटो ओळ - यवलूज ते काटेभोगाव दरम्यानच्या साईडपट्ट्यांच्या दुरुस्तीचे काम ताबडतोब सुरू असल्याने नागरिकांतून व वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.