कोल्हापूर : भाजीपाला मोघम पद्धती बंद करा, सहा टक्के अडत रद्द करा, सौदे पहाटे पाच ते सात या दरम्यान करा, आदी मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या किरकोळ भाजी व्यापाऱ्यांचा संप अखेर मिटल्याने बुधवारी दिवसभर शहरातील सर्व भाजीपाला मंडई गजबजल्या. भाज्यांची आवक वाढल्याने दरही सर्वसामान्यांचा आवाक्यात आलेत. गेले आठ दिवस सुरू असलेल्या बंदवर समन्वयाची भूमिका घेत किरकोळ विक्रेत्यांच्या मागण्यांना काहीअंशी न्याय मिळाला. त्यात मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सौदे पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत काढण्याचा निर्णय उभयतांमध्ये घेण्यात आला, तर किरकोळ व्यापाऱ्यांकडून यापुढे सौदे बंद न पाडण्याची ग्वाही देण्यात आली. सहा टक्के अडत देण्यावरून समिती व व्यापाऱ्यांनी सरकारकडे म्हणणे एकत्रित मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. किरकोळ व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतल्यानंतर बुधवारी मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सौदे काढण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या सहा दिवसांत अगदी तुरळक प्रमाणात बाहेरून माल आला. त्याचे सौदेही अल्प प्रमाणात झाले. सौदे झालेला मालही गोवा, कोकणात गेला. त्यामुळे थेट शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या पालेभाज्यांवर शहरवासीयांना अवलंबून राहावे लागले. त्यात विशेष म्हणजे थेट शेतकऱ्यांना किरकोळ भाजी विक्रेत्यांचा विक्री भाव मिळाला. गेल्या चार दिवसांमध्ये तर भाज्यांचे दर आवाक्याबाहेर गेले. त्यामुळे दरही उच्चांकी राहिले होते. मात्र, बंद मागे घेतल्यानंतर बुधवारी हेच भाजी दर आवाक्यात आले. किरकोळ बाजारात दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. गेल्या चार दिवसांत ४० ते ५० रुपये प्रतिकिलो पोहोचलेला टॉमेटोचा दर २० रुपये किलोप्रमाणे खाली आला, तर हिरवी मिरचीही ४० रुपये, तर भेंडी ४० रुपये प्रतिकिलो, दोडका ६० रुपये किलो, कोंथिबीर पेंढी ५ रुपये प्रतिनग, मेथी ८ ते १० रुपये पेंढी, पोकळा १० रुपये दोन जोड्या असे दर पूर्ववत आले.जाधव यांचे उपोषण मागेकिरकोळ पालेभाजी व्यापाऱ्यांच्यावतीने मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व किरकोळ भाजी व्यापारी शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या समन्वय बैठकीनंतर बुधवारी जाधव यांनी उपोषण स्थगित केले. यावेळी आंदोलनही मागे घेतले गेले. व्यापाऱ्यांचे हातावरचे पोट असल्याने व नागरिकांना भाजी न मिळाल्याने हाल झाले. या सर्व बाबींचा विचार करून व्यापाऱ्यांनी हा बंद मागे घेतला. दिवसभरात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक झाली. दरही कमी झाले आहेत. - मेहबूब बागवान, भाजीपाला किरकोळ व्यापारीसहा टक्के अडत रद्द करावी याकरिता किरकोळ व्यापारी व समितीमार्फत सरकारकडे म्हणणे मांडू. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर स्वाभिमानी संघटना गप्प बसणार नाही. रीतसर मार्गांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. त्यांच्या पाठीशी राहू.- भगवान काटे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्षबाजारपेठ फुलल्याकपिलतीर्थ, राजारामपुरी, रेल्वे फाटक, ऋणमुक्तेश्वर, राजाराम टिंबर मार्केट (संभाजीनगर), पाडळकर मार्केट, सूसरबाग (लक्ष्मीपुरी), यासह जिल्ह्णातील विविध गावांचे आठवडा बाजारही भाजी विक्रेत्यांच्या गलबलाटाने गजबजले .
मंडई पुन्हा गजबजल्या
By admin | Updated: March 9, 2017 00:12 IST