कोल्हापूर : ‘जोतिबा’ या मराठी मालिकेचे चित्रनगरीत चित्रीकरण, हिंदी मालिकेच्या सेटची उभारणी, पन्हाळ्यावर वेबसिरीजचा थरार, पावनखिंड चित्रपटाच्या शुभारंभाचा नारळ, एवढेच काय परदेशातील रिॲलिटी शो, हॉलीवुडपटांची निर्मिती, लघुपट.. येत्या महिन्यात आणखी दोन प्रॉडक्शन हाऊसचे आगमन.. ही यादी आहे कोल्हापुरातील चित्रीकरणाच्या घोडदौडीची. कोरोनाचे संकट कोल्हापुर चित्रपटसृष्टी व व्यावसायिकांसाठी इष्टापत्ती ठरली आहे.. चित्रनगरीसारखा भव्य दिव्य सेट, लोकेशन, कलाकारांपासून ते तंत्रज्ञांपर्यंतची फळी, स्वच्छ हवा, कमी बजेट या सगळ्या बाजूंनी पॉझिटिव्ह असलेल्या कोल्हापुरात सध्या मोठ्या प्रमाणात चित्रीकरण सुरू आहे. ही घोडदौड पाहता पुढील काही वर्षांत मुंबईनंतर कोल्हापूरच चित्रपटसृष्टीचे हब ठरेल यात शंका नाही.
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी कोल्हापुरात लावलेल्या चित्रपटसृष्टीच्या बीजाचे वटवृक्षात रुपांतर होऊन या शहराने एकेकाळी सिनेजगताला अनेक मोठे कलाकार दिले आहेत. मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही सुवर्णकाळ देणाऱ्या या शहराने आता चित्रीकरणाच्या क्षेत्रातही कात टाकली आहे. कोरोनाने मुंबईला बेहाल केले असताना कोल्हापुरात मात्र रुग्णांची संख्या कमी होती. त्यामुळे येथील आनंद काळे, मिलिंद अष्टेकर, स्वप्नील राजशेखर, अजय कुरणे, रवि गावडे यांच्या चित्रपट व्यावसायिक समितीने मुंबईतील थांबलेले प्रोजेक्ट कोल्हापुरात आणण्यासाठी धडपड केली. त्यांना पालकमंत्री सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर यांची साथ लाभली. कोरोनाची आपत्ती कोल्हापूरसाठी इष्टापत्ती ठरली आणि मालिकांचे चित्रीकरण येथे सुरू झाले. कोल्हापूर चित्रनगरी आता सर्व सोयींनी सुसज्ज आहे.
----
चित्रनगरीचे रेड कार्पेट
राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात दहा कोटी खर्चून मोरेवाडी येथील कोल्हापूर चित्रनगरीचा विकास केला. एकाच मोठ्या स्टुडिओच्या भोवतीने पोलीस स्टेशन, न्यायालय, महाविद्यालय, हॉस्पिटल बंगला अशी रचना आहे. शेजारी वाडा आहे. बाह्य परिसरात हिरवळ, गार्डन, पथदिवे आणि चकाचक रस्ते आहेत. नंतर तीन कोटींत खुले सेट, पाणी, लाइट, स्वच्छतागृह, गोडावून उभारले आहे. महसूल मिळेल त्याप्रमाणे भविष्यात १०० बाय १५०चा मोठा स्टुडिओ, विमानतळ, रेल्वे स्टेशन, मंदिर असे अगदी हिंची चित्रपटांसाठी लागणारे लोकेशन्सही तयार करण्यात येणार आहेत. चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या पुढाकारातून हे घडत आहे.
--
नैसर्गिक लोकेशन्स
कोल्हापूरचे वातावरण आरोग्यदायी व शुद्ध आहे, वडणगे पाडळी, वसगडे, केर्ली, रजपूतवाडी, जोतिबा, पन्हाळा, गगनबावडा अशा ग्रामीण भागात अनेक, नैसर्गिक लोकेशन्स आहेत, तर शहरात न्यू पॅलेस, रंकाळा, टाऊन हॉल येथे चित्रीकरण केले जाते. पन्हाळा नगर परिषदेने तर शुटिंग चार्जेस बंद केले आहेत.
--
कलाकार तंत्रज्ञांची फळी
कोल्हापूरला चित्रपटसृष्टीची परंपरा असल्याने येथे लेखक, दिग्दर्शक, सहदिग्दर्शक कथाकार, पटकथाकार, संगीतकार यांच्यापासून ते पहिल्या दुसऱ्या फळीतील कलाकार, तंत्रज्ञ, मॉब आर्टिस्ट, कॅमेरामन असे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याहून येताना मुख्य दिग्दर्शक, कलाकार आणि कॅमेरा आणला की चित्रीकरण सुरू होते. अनेक कलाकार मालिकांमध्ये चमकत आहेत. नेपथ्यापासून ते जेवणापर्यंत, वेशभूषेपासून ते सेट लावण्यापर्यंत सगळी व्यवस्था स्थानिक व्यावसायिकांकडून केली जाते. ही संख्या अडीच हजारांवर आहे.
--
कमी बजेट
सध्या गोरेगाव फिल्मसिटीत जी मोकळी जागा महिन्याभरासाठी ७ ते १३ लाख रुपये भाड्याने मिळते. त्याहून दुप्पट म्हणजे दोन एकर जागा कोल्हापूर चित्रनगरीत १ ते दीड लाखांत मिळते एवढी मोठी आर्थिक तफावत स्टुडिओच्या भाड्यामध्ये आहे. येथे चित्रीकरणाचा ओघ वाढावा यासाठी निर्माते, दिग्दर्शकांसाठी रेट कार्पेट अंथरले असून, कमी बजेटमध्ये सर्व सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. कोणत्याही लोकेशनला गर्दी- गोंगाटाचा त्रास नाही, शांतपणे चित्रीकरण पार पडते. महेश कोठारे यांच्या ‘जोतिबा’ मालिकेपासून येथे चित्रीकरणासाठी अनेक प्रॉड्क्शन हाऊस विचारणा करत आहेत.
--
फोटो स्वतंत्र