आनंदा वायदंडे
वारणानगर : राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त स्वराज्य युवा प्रतिष्ठान, ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या वतीने व वारणा उद्योग आणि शिक्षण समूहाच्या सहयोगातून छत्रपती शिवाजी महाराजांची सुमारे साडेचार लाख चौरस फुटांची जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी वारणानगरमध्ये साकारण्यात आली आहे. आज रविवारी ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली होणार आहे.
विनयनगर येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी या सैनिकी शाळेच्या पटागणांवर छत्रपती शिवरायांची उभी प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारली असून, आज रविवारी सकाळी १० वाजता आमदार डॉ. विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, अध्यक्ष समीर काळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण साहेळा होईल. यावेळी स्वराज्याची यशोगाथा सांगणारा स्वराज्य गाथा हा ऐतिहासिक कार्यक्रम सादर होईल.
स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे यांच्या संकल्पनेतून बुधवारी सांयकाळी १५ ते २० वीस महिलांनी रांगोळी काढण्यास सुरुवात केली होती, हळूहळू १५० महिला प्रतिनिधी आणि १९० शालेय मुलांचे असे ३५० कलाकारांचे हात रांगोळी काढण्यासाठी राबले. शनिवारी सांयकाळी रांगोळी काढून पूर्ण झाली. काही महिन्यांपूर्वी काळे यांनी वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. कोरे यांची भेट घेऊन छपती शिवरायांची रांगोळी साकारण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती.
विश्वविक्रमासाठी प्रयत्न
यापूर्वी मिर्झापूर येथे ३ लाख ४५ हजार चौरस फुटांची व्होटिंग मशिनची रांगोळी काढण्यात आली होती. शिवरायांची रांगोळी साडेचार लाख चौरस फुटांची असून, या विश्व विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे यांनी सांगितले. ही रांगोळी साकारण्यासाठी ३६ टन रांगोळी लागली आहे.
राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण...
ही रांगोळी पाहण्यासाठी राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व अन्य मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
कोल्हापूरसह महाराष्ट्राला अभिमान वाटावा, असा आगळावेगळा हा उपक्रम वारणेत होत आहे. ताराराणी बिग्रेडच्या सुमारे ३२५ हून अधिक महिला कलाकारांचा यात सहभाग आहे. छत्रपती शिवरायांच्या श्रद्धेतून महिला, शालेय मुले-मुलींनी मन लाऊन रांगोळी साकारली आहे. रांगोळीची नोंद जागतिक रेकार्डमध्ये होईल. रांगोळी पाहण्याचा आनंद सर्वांनीच घ्यावा
आमदार डॉ.विनय कोरे, अध्यक्ष-वारणा उद्योग व शिक्षण समूह.