कळे गावच्या पश्चिमेला, प्रा.आ. केंद्राच्या पाठीमागून आसगाव, खेरीवडे या दोन गावांना व कोकणवाडी वस्तीकडे जायला ओढ्यातूनच वाट होती. या ठिकाणी गेल्या ६० वर्षांपासून सुमारे १० ते १२ कुटुंबांची वस्ती आहे. पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिकाणी जायला रस्ताच नव्हता. येथील नागरिक, महिला वर्ग व विद्यार्थ्यांना गावामध्ये गुडघाभर पाणी व चिखलातून वाट काढतच ये-जा करावी लागत होती. शेतकऱ्यांना या परिसरातील ऊस डोक्याने ओढून बाहेर काढण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय कळे येथील धर्मराज व भैरवनाथ या दोन मंदिरांच्या पालख्या याच रस्त्यावरून जातात. तसेच मुस्लीम समाजाच्या दफनभूमीकडे याच वाटेवरून जावे लागते. भविष्यात कळे पोलीस ठाणे व न्यायालयाच्या नियोजित जागेकडे कळे गावातून जाणारी जवळची वाट हीच असल्याने या ओढ्यावर पूल बांधून रस्ता होणे गरजेचे होते.
याबाबत जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील यांनी पाठपुरावा करून सुरुवातीला या रस्त्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी लावून काम सुरू केले.