कोल्हापूर : कार विक्रीचे आमिष दाखवून महिलेची दोन लाखाहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ठाण्यातील एकावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दाजीराम चंद्रकांत पवार (ठाणे, मुंबई) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.
मोरेवाडी (ता. करवीर) येथे स्वाती अभिजित दाभोळकर राहतात. त्यांच्या पतीच्या टायर विक्रीच्या व्यवसायासाठी त्यांना कार खरेदी करायची होती. त्याचवेळी त्यांना कार विक्रीची जाहिरात ऑनलाईन पाहायला मिळाली. त्यात कारचा फोटोही होता. जाहिरातीतील दाजीराम पवार याच्या मोबाईल नंबरवर त्यांनी फोन करून संपर्क साधला. त्याने कार विकायची असल्याचे सांगून ॲपद्वारे २० हजार रुपये भरावेत, पैसे भरल्यानंतर कार दुसऱ्या दिवशी पत्त्यावर पाठवतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मोबाईलवरून व अन्य खात्यावरून पवारला २ लाख ४ हजार ५९८ इतकी रक्कम दिली. हा प्रकार २३ व २४ जानेवारीअखेर घडला. पैसे भरल्यानंतरही त्याने कार देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे दाभोळकर यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.