लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीसाठी जिल्हा परिषदेच्या ६७ सदस्यांमधून २९ सदस्य निवडावयाचे असून त्यासाठी प्राधान्याने ज्यांना पदे मिळालेली नाहीत त्यांना भाजप व मित्रपक्षांकडून संधी देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा नियोजन समितीसाठी आज (मंगळवार)पासून अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक आणि पाठिंबा दिलेल्या सर्व गटांच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार आहेत. एकूणच जिल्ह्णाच्या विकास प्रक्रियेमध्ये जिल्हा नियोजन समितीला मोठे महत्त्व असते. याच समितीच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. या पार्श्वभूमीवर या समितीवर काम करण्याची संधी मिळावी यासाठी अनेक सदस्यांची इच्छा असते. पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या या समितीमध्ये खासदार, आमदार यांचाही सहभाग असल्याने या समितीवर येण्यासाठी अनेकांची धडपड असते. जिल्हा परिषदेवर भाजप व मित्रपक्षांची सत्ता आणण्यासाठी अनेकांचे सहकार्य घ्यावे लागले आहे. सध्या भाजपकडे अध्यक्षपद असून शिवसेनेकडे उपाध्यक्ष आणि सभापती अशी दोन पदे आहेत तर ‘जनसुराज्य’कडे दोन सभापतिपदे आहेत.‘स्वाभिमानी’लाही एक सभापतिपद देण्यात आले आहेत. त्यामुळे या पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांना त्या त्यावेळी नियोजन समितीचे सदस्यत्व देऊ, असे सांगण्यात आले होते. आता अशांनी जोर धरला आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भुदरगड विकास आघाडी, शिवसेनेचे दोन सदस्य असे जिल्हा परिषदेत विरोधी गटांत आहेत. त्यांची बैठक शुक्रवारी होत आहे. त्यांच्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये चांगली मांडणी करतील अशांना पाठविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
पद नसलेल्यांना संधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:37 IST