कोल्हापूर : आरक्षणासाठी मराठा समाजातील लोकांनी केलेले बलिदान राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व्यर्थ ठरले आहे. त्यामुळे आरक्षणासाठी यापुढे सरकार विरोधात आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाने गुरूवारी घेतला आहे, अशी माहिती या मोर्चाचे समन्वयक सचिन तोडकर यांनी दिली.
येथील रविवार पेठेतील जिजाऊ कार्यालयात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या मुख्य समन्वयकांची बैठक झाली. त्यामध्ये समन्वयकांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. खासदार संभाजीराजे आणि आमदार नितेश राणे यांनी सकल मराठा समाजाचे नेतृत्व करावे. त्यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा तरूणाईने हाती घ्यावी, असेही यावेळी ठरविण्यात आले. पुढील टप्प्यात सकल मराठा समाजाच्या तालुकास्तरीय समन्वयकांची बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती सचिन तोडकर यांनी दिली. या बैठकीस दिलीप पाटील, स्वप्नील पार्टे, संजय वाईकर, शैलेश जाधव, भास्कर पाटील, समर्जित तोडकर, उमेश साळुंखे, धनश्री तोडकर, गायत्री राऊत, सरस्वती थोरात, स्वाती कदम, अभिषेक जाधव उपस्थित होते.